‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये रेड कार्पेटवर मराठी कलाकारांची चमकदार एन्ट्री
सॅन होजे : नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन (नाफा) आयोजित दुसऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाची उलटी गिनती सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे जल्लोषात स्वागत करताना ‘नाफा’ कुटुंबाने सणासारखा आनंद साजरा केला. २४ जुलैच्या रात्री ‘नाफा’चे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅलीतील निवासस्थानी आयोजिलेल्या स्वागत समारंभात कलाकारांच्या उपस्थितीने उत्साह ओसंडून वाहत होता.
मराठी चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसार आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’सारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते आणि यशस्वी उद्योजक अभिजीत घोलप यांनी ‘नाफा’ची स्थापना केली. या उपक्रमाला आता भव्य महोत्सवाचे रूप आले असून, त्याच्या यशस्वी आयोजनासाठी १०० ते १५० स्वयंसेवकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जीव ओतून मेहनत घेतली आहे.
२५ जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ मध्ये विविध चित्रपटांचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची सुरुवात ‘फिल्म अवॉर्ड नाईट’ ने होणार असून, ‘नाफा जीवन गौरव पुरस्कार’ कोणत्या मान्यवराला जाहीर होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
हॉलिवूडमधील प्रतिष्ठित ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये अंथरले गेलेले रेड कार्पेट, कॅमेऱ्यांचे झगमगते प्रकाश, सेलिब्रिटींचा उत्साह आणि चाहत्यांची गर्दी — यामुळे संपूर्ण सॅन होजे शहर सणासारख्या उत्साहात न्हालं आहे. हॉलिवूड नगरीने मराठी कलाकारांचे स्वागत करताना आपले दार खुले केले आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रभावी उपस्थितीची साक्ष दिली आहे.
यंदाच्या महोत्सवात ॲड. आशिष शेलार (महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री), डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, महेश कोठारे, गजेंद्र अहिरे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, संध्या गोखले, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांसारख्या नामवंत कलाकारांची उपस्थिती महोत्सवाची शान वाढवत आहे.
या कलाकारांच्या स्वागतासाठी नाफा टीमच्या रिया ठोसर, अरुंधती दात्ये, अर्चना सराफ, डॉ. गौरी घोलप, अनूप निमकर, विनायक फडणवीस, वृषाली मालपेकर, योगी पाटील, लक्ष्मण आपटे, गौरी कुलकर्णी, निरंजन पागे, हर्षा, पूजा, निमा, मनीष आणि मानसी देवळेकर या पदाधिकाऱ्यांसह अमेरिकेतील शेकडो स्वयंसेवक सज्ज आहेत.
गेल्या वर्षीपासून सॅन होजे शहरात सुरु झालेला हा महोत्सव यंदा अमेरिकेच्या संसदेकडूनही मान्यता आणि गौरव मिळवतो आहे. खासदार श्री. श्री. ठाणेदार यांनी नुकतीच अमेरिकेच्या संसदेच्या सभागृहात ‘नाफा’ महोत्सवाचा विशेष गौरवपूर्वक उल्लेख केला.