मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दलित-मुस्लिम एकजुटीच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मीयांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष मजबूत ताकद उभी करेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज येथे केले.
बांद्रा येथे आयोजित कार्यक्रमात ना. आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या मुंबई अध्यक्षपदी सोहेल शेख यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली. या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, केवळ दलितच नव्हे तर मुस्लिम, गुजराती, हिंदी भाषिक आणि सर्व समाजघटकांना उमेदवारी देऊन रिपब्लिकन पक्ष मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवून देईल.
नियुक्तीनंतर सोहेल शेख यांनी ना. रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, “मुंबई महापालिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार नक्कीच निवडून येतील.”
मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील तरुण, उत्साही आणि क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे सोहेल शेख हे दलित-मुस्लिम एकता परिषद या मंचावरून सक्रिय आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कामगिरीची दखल घेत, पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मुश्ताक बाबा यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या निमित्ताने सोहेल शेख यांनी पक्षाध्यक्ष ना. रामदास आठवले, सौ. सिमाताई आठवले, अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, बाळासाहेब गरुड, विवेक पवार, वकार खान, प्रकाश जाधव, मुश्ताक बाबा, रमेश गायकवाड, अजित रणदिवे, संजय पवार, संजय डोळसे, अमित तांबे, हसन शेख, रतन असवारे आदी पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या नियुक्तीचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले आहे.

