मुंबई :भारत–यूके मुक्त व्यापार करारामुळे (FTA) भारतीय निर्यातदार आणि लघुउद्योगांसाठी नवे क्षितिज खुले झाले असून, या ऐतिहासिक करारानंतर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला.
बोरीवली येथे आयोजित या कार्यक्रमात “यूके बाजारातील निर्यात संधी” या विषयावर विशेष सत्र घेण्यात आले, ज्यात विविध उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले.
कार्यक्रमात बोलताना मंत्री गोयल म्हणाले, “हा करार केवळ व्यापार विस्तार नाही, तर विकसित भारताच्या दिशेने एक धाडसी पाऊल आहे. वस्त्र, दागिने, मत्स्यव्यवसाय, MSME, IT आणि सेवाक्षेत्रासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले असून, करारामुळे भारतीय उत्पादकांना यूकेसारख्या प्रगत बाजारात सुलभ प्रवेश मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्यांनी मत्स्य व्यवसाय व स्थानिक निर्यातदारांना या करारामुळे मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले.
अखेरच्या सत्रात निर्यात प्रक्रियेबाबत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले आणि पीयूष गोयल यांचे भारताच्या आर्थिक परिवर्तनासाठी योगदानाबद्दल विशेष आभार मानण्यात आले.