मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्नधान्याचे वितरण करणाऱ्या रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
सध्या ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणासाठी रेशन दुकानदारांना १५० रुपये प्रति क्विंटल (१५०० रुपये प्रति मेट्रिक टन) इतके मार्जिन दिले जाते. या दरामध्ये २० रुपये प्रति क्विंटल (२०० रुपये प्रति मेट्रिक टन) इतकी वाढ करून आता १७० रुपये प्रति क्विंटल (१७०० रुपये प्रति मेट्रिक टन) मार्जिन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे वार्षिक ९२ कोटी ७१ लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
“गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानदारांच्या मार्जिन वाढविण्याची मागणी होत होती. याबाबत अनेक बैठका झाल्यानंतर सरकार सकारात्मक भूमिकेत होते. त्यामुळे आज मंत्रिमंडळाने रेशन दुकानदारांच्या मार्जिन वाढीचा निर्णय घेतला आहे,” असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.