मुंबई – मागील तीन-चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (loss of crop due to heavy rain) झाले आहे. शेतात पाणी शिरल्याने उभी पिके वाहून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे. राज्यभरात जवळपास १५ लाख एकरांवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
सपकाळ (MPCC President Harshwardhan Sapkal) यांनी पत्रात म्हटले आहे की, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे १७ जिल्ह्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.
• ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबीन, मूग, कापूस, तूर, फळबागा आणि भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
• हजारो हेक्टरवरील ऊस पिकाचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पशुधन वाहून गेले आहे.
• नांदेड जिल्ह्यात तर जिवीतहानी झाल्याची नोंद झाली आहे.
“आधीच संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात ढकलले आहे. राज्य सरकारने पंचनाम्यांचे आदेश दिले असले तरी या कठीण प्रसंगी सर्व नियम-अटी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी,” असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
तसेच ज्या कुटुंबीयांनी जिवीतहानी सहन केली आहे त्यांना विशेष सहानुभूतीपूर्वक मदत करावी, अशीही मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.