मुंबई: राज्यातील भाजपप्रणीत महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचा जोरदार सिलसिला सुरू केला आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे कसे मागे राहतील? आता त्यांनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रित केले असून, तेथे २५ ऑगस्ट रोजी एक मोठा राजकीय भूकंप घडविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या घडामोडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात भूकंपसदृश हालचाल होणार असून, प्रवेश घेणारा नेता हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष, उद्योग क्षेत्रात मजबूत पकड असलेला आणि एका बड्या घराण्याचा वारस मानला जातो. त्यामुळे या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात हलणार आहेत.
युवा नेत्याची ताकद जिल्ह्यात आधीच सिद्ध झाली आहे. २०२४ च्या करवीर विधानसभा निवडणुकीत त्यांनी बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः नाकी नऊ आणले होते. विजयासाठी अवघी १७०० मते कमी पडल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला, परंतु त्या निवडणुकीने त्यांच्या नेतृत्वाची ताकद ठळकपणे समोर आली.
हा नेता म्हणजे माजी आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील. जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकीर्द सुरू करून त्यांनी अध्यक्ष म्हणून ठसा उमटविला. त्यानंतर राजीवजी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्षपद सांभाळत उद्योगक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.
आता २५ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश कोल्हापूरच्या राजकीय पटावर मोठी उलथापालथ घडवणारा ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
त्यामुळे कोल्हापुरातील हा ‘राजकीय स्फोट’ नेमका कोणाच्या पायाखालची जमीन सरकवणार, याकडे राज्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण डोळे लावून बसले आहे.