मुंबई : मंत्रालयातील गृह, कृषी आणि सामान्य प्रशासन विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावून निवृत्त झालेल्या सौ. शैलजा विजय शिंदे यांचे आज पहाटे चारकोप, कांदिवली येथे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.
सहकार आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय भास्कर शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांची एकमेव कन्या अंकिता हिने अखेरपर्यंत आईची अहोरात्र सेवा शुश्रूषा केली. अंकिताचा विवाह कोकणातील ज्येष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांचे सुपुत्र तेजस चव्हाण यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. मात्र नियतीला हे सुख मान्य नव्हते. तेजस चव्हाण यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. या आघातातून सौ. शैलजा कधीच सावरू शकल्या नाहीत आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली.
मधुमेहामुळे त्यांना आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करावे लागत होते. दुसरीकडे, विजय शिंदे यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्याने ते अंथरुणाला खिळले होते. त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरु होती. दरम्यान, काल डायलिसिसनंतर सौ. शैलजा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विजय शिंदे यांनी परळ-लालबाग येथील सुपारीबाग सुपरमार्केट संस्थेचे अध्यक्षपद तसेच अपना सहकारी बँकेचे संचालकपद भूषविले होते. त्यामुळे सहकारी व समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते, मंत्रालयातील त्यांचे सहकारी तसेच चारकोप, कांदिवली परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले. दुपारी साश्रूनयनांनी दिवंगत सौ. शैलजा विजय शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.