मुंबई: ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – पॅरा स्विमिंग २०२५’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक विधी अधिकारी संतोषकुमार यादव यांचा आज (२६ ऑगस्ट) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात सत्कार करण्यात आला.
दोन्ही हात नसतानाही जलतरणात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. जोशी यांनी त्यांचे कौतुक केले आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख विधी अधिकारी श्रीमती कोमल पंजाबी यांच्यासह विधी विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. यादव हे पालिकेच्या ‘एस’ विभागात कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे. पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात १८ ऑगस्ट रोजी झालेल्या ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – पॅरा स्विमिंग २०२५’मध्ये त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याआधी, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या ‘लायन्स इंटरनॅशनल’ स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते