मुंबई : बोरिवली पूर्व–पश्चिम द्रुतगती महामार्गापासून ठाण्यापर्यंत उभारल्या जाणाऱ्या भूयारी मार्गाला ठाण्याकडील बाजूला धर्मवीर आनंद दिघे आणि बोरीवलीकडील बाजूला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व समाजसेवक दिवंगत विजय वैद्य यांची नावे द्यावीत, अशी भावनिक मागणी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आदरांजली सभेत करण्यात आली.
मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात, अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत उपस्थितांनी विजय वैद्य यांच्या कार्याची उजळणी केली. त्यांच्या विचारांनी व सामाजिक बांधिलकीने प्रेरित झालेल्या असंख्य श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
सभेत हेही अधोरेखित झाले की, भूयारी मार्गाच्या कामामुळे ग्रंथालयाच्या इमारतीवर संकट ओढवले आहे. त्यामुळे आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्वतः लक्ष घालून ग्रंथालयासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात पत्रव्यवहार केला असून, पर्यायी जागाही सुचविण्यात आल्या आहेत.
विजय वैद्य यांनी सुरु केलेले जय महाराष्ट्र नगर सार्वजनिक गणेशोत्सव आणि वसंत व्याख्यानमाला यांसारखे उपक्रम सतत सुरु ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सभेत प्रा. नयना रेगे, शुभदा शिंदे, अमित मोरे, दादासाहेब शिंदे, योगेंद्र ठाकूर, सुभाष देसाई, वसंत सावंत, शाम साळवी, जयवंत राऊत, स्मीता डेरे, संजना वारंग, सुरेखा देवरे, राकेश वायंगणकर, हेमंत पाटकर, कीर्ती कुमार शिंदे, शाम कदम आदींनी विजय वैद्य यांच्या स्मृतींना उजाळा देत हृदयपूर्वक आदरांजली अर्पण केली.