’अरे संसार संसार’ काव्य-गीतमय मैफलीला उस्फूर्त प्रतिसाद
By श्रीकांत जाधव
मुंबई : साध्या, सरळ आणि सर्वसामान्यांच्या भावविश्वाला भिडणाऱ्या बहिणाबाईंच्या कवितांनी मंगळवारी मुंबईकरांना मंत्रमुग्ध केले. “अरे संसार संसार” या अजरामर कवितेवर आधारलेल्या काव्य, संगीत आणि निवेदनाने सजलेल्या कार्यक्रमात रसिकांना अविस्मरणीय अनुभव लाभला.
कवी ना.धों. महानोर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर, भवरलाल-अँड-कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, डॉ. शामकांत देवरे आणि राजश्री शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निसर्गाशी संवाद साधताना सहजतेने उमटलेल्या बहिणाबाईंच्या कवितांना संगीताची साथ लाभली. त्यांच्या कवितांतील खानदेशी शब्द, गेयता आणि भावविश्वाने रसिकांना अंतर्मनापर्यंत भिडवले.
‘अरे संसार संसार’ या परिवर्तन निर्मित संगीतमय कार्यक्रमाचा हा ५० वा प्रयोग होता. संकल्पना विजय जैन, दिग्दर्शन नारायण बाविस्कर, निर्मिती प्रमुख हर्षल पाटील तर शंभू पाटील यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रम अधिक भारदस्त झाला.
श्रद्धा कुलकर्णी, सुनीला भोलाणे, प्रतिक्षा कल्पराज, भूषण गुरव, विशाल कुलकर्णी, यश महाजन, रोहित बोरसे, सोनाली पाटील, अक्षय नेहे, समृद्धी पाटील, गोविंद मोकाशी, अजय पाटील, गणेश सोनार आदी कलाकारांनी बहिणाईंच्या कवितांना सुरांची साथ देत रसिकांना भारावून टाकले.
“माझी माय सरस्वती”, “माहेर”, “खोकली माय”, “धरतीच्या कुशीमंदी”, “पिक करपलं”, “मंजा”, “अरे संसार संसार”, “माले मायह जीव”, “मायी सासुरवाशीन” अशा अनेक कविता सादर झाल्या. यासोबतच कवी ना.धों. महानोर यांच्या काही कविता देखील वाचल्या व गाऊन दाखवल्या.
प्रत्येक कवितेतून उमटलेले मानवी भाव, साधेपणातली सखोलता आणि गेय सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रेक्षकांनी उस्फूर्त दाद देत बहिणाबाईंच्या कवितांच्या अमरत्वाला सलाम केला.