मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः घरात बसलेले अजगर आहेत, जे दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात,” अशा तीक्ष्ण शब्दांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्याच नैराश्यामुळे ते आज विषारी वक्तव्य करत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “इतरांना ॲनाकोंडा म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी आरशात पाहावे. कारण ते घरात बसलेले अजगर आहेत — जे काही करत नाहीत, पण दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुत्कार काढतात.”
बावनकुळे यांनी ठणकावले की, “या अजगराने स्वतःचा पक्ष गिळला, सैनिकांना गिळले, आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वविचारांनाही गिळंकृत केले. २५ वर्षे मुंबई गिळंकृत करणारा तोच आज इतरांवर दोष देत आहे.”
बावनकुळे यांनी पुढे सांगितले, “आदरणीय अमितभाई शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात आणि ३७० कलम रद्द करून इतिहास रचतात. पण उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदीजी आणि अमितभाईंवर टीका करण्याचाच उद्योग करतात.”
“उद्धव ठाकरे यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. आम्ही त्या नीच स्तरावर जाऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची जाणीव त्यांना आधीच झाली असल्याने, ते आता स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी विवेकभ्रष्ट विधानं करत आहेत,” असे बावनकुळे म्हणाले.
शेवटी बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या विकृत राजकारणाला आता त्यांचा स्वतःचा कार्यकर्ता कंटाळला आहे. एक दिवस अशी वेळ येईल की मागे वळून पाहिलं तरी त्यांच्या सोबत कुणीही राहणार नाही.”

