मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पोदनपूरा जैन मंदिराच्या संस्थापक विश्वस्त आणि धर्मानुरागी श्रीमती जिनमती शहा यांचे वृध्दापकाळाने शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभादेवी येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.
त्या बारामतीतील प्रसिद्ध उद्योगपती श्रीमंत शेठ चंदुकाका सराफ यांच्या कन्या आणि फलटणचे धनाढ्य व्यापारी तसेच जैन समाजाचे आधारस्तंभ चंदुलाल शहा यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे.
जिनमतीबाई यांच्या पार्थिवावर आज (८ नोव्हेंबर २०२५) दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, ब्रिच कॅण्डी आणि ताडदेव परिसरातील अनेक उद्योजक, साहित्यिक, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांच्या निधनानंतर बेस्ना, उठामणा किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
जिनमती शहा या अत्यंत धर्मनिष्ठ आणि परोपकारी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जात.
त्यांनी बोरीवलीतील पोदनपूरा जैन मंदिराच्या उभारणीत आणि विकासात मोलाचे योगदान दिले.
या मंदिरासाठी त्यांनी काही एकर जमीन दान केली असून, त्या संस्थापक विश्वस्त म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहिल्या.
जिनमती शहा यांच्या कुटुंबाचा मुद्रण व्यवसायाशीही घनिष्ठ संबंध होता. मुंबईतील अनेक दैनिके, साप्ताहिके आणि पाक्षिकांची छपाई त्यांच्या वरळी येथील मुद्रणालयात होत असे.
जिनमती शहा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका बीनाताई शहा यांच्या मातोश्री होत. धर्म, समाजसेवा आणि प्रामाणिकपणाचा वारसा त्यांनी आपल्या संततीत रुजविला.
त्यांच्या निधनाने मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील जैन समाजासह सामाजिक क्षेत्रात एक श्रद्धेय, शांत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

