मुंबई : देशातील सर्वोच्च व्यावसायिक संघटना असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) ने खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजक डॉ. उमेश मुंजाजी कांबळे यांची २०२५-२६ साठी असोचॅम महाराष्ट्र राज्य विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
असोचॅमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. कांबळे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. या नियुक्तीसह डॉ. कांबळे हे असोचॅमच्या राष्ट्रीय व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत राहणार आहेत.
असोचॅमने डॉ. कांबळे यांच्यावर राज्याच्या उद्योग-विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यामध्ये—
- वर्षभरात किमान चार परिषद बैठका आयोजित करणे
- महाराष्ट्राच्या उद्योगवाढीस चालना देणारी धोरणपत्रे आणि ज्ञान-अहवाल तयार करणे
- मोठ्या परिषदा, सेमिनार व उद्योगसंवाद कार्यक्रमांचे आयोजन
- राज्य व केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यां आणि मंत्र्यांसमोर उद्योगहितांचे प्रतिनिधित्व करणे
- परिषदेच्या उपक्रमांसाठी निधी उभारणीचे नेतृत्व करणे
नियुक्ती स्वीकारताना डॉ. कांबळे म्हणाले, “असोचॅमच्या या प्रतिष्ठित व्यासपीठावरून महाराष्ट्राला देशातील सर्वात गुंतवणूक-स्नेही आणि नाविन्यपूर्ण राज्य बनवण्याचा माझा संपूर्ण प्रयत्न राहील. खाद्यसुरक्षा, अन्नप्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्याबरोबरच ‘झिरो फूड वेस्ट’ या ध्येयाकडे वाटचाल करणार आहे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न महाराष्ट्रातूनच साकार होणे आवश्यक आहे.”
डॉ. उमेश कांबळे यांना खाद्यतंत्रज्ञान क्षेत्रातील २१ वर्षांचा समृद्ध अनुभव असून ते सध्या F2UF Corporate Consultants Pvt. Ltd., Waste to Best Enviro Engineering LLP आणि FoodTech Pathshala Pvt. Ltd. या संस्थांचे संचालक आहेत.
त्यांनी यापूर्वी SGS इंडिया, रिलायन्स रिटेल आणि गोडरेज अॅग्रोव्हेट येथे वरिष्ठ पदांवर कार्य केले आहे. २०२३ मध्ये त्यांना AFSTI–FSSAI राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. कांबळे यांच्या नियुक्तीचे महाराष्ट्रातील उद्योग, अन्नप्रक्रिया, कृषी-अभियांत्रिकी आणि स्टार्टअप क्षेत्राकडून भरभरून स्वागत होत आहे.

