नियंत्रण विभागाचा निर्णय – अवैध धान्य व्यापाऱ्यांना धडा शिकवणार
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील महापे येथील गोदामात अवैधरीत्या शिधावाटपाचे सरकारी धान्य खरेदी-विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे जिल्हा नियंत्रक कार्यालय व नागरी पुरवठा विभाग, मुंबई यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल ₹4,69,923/- किमतीचा सरकारी तांदूळ जप्त करण्यात आला.
ही कारवाई अवघ्या काही तासांच्या पाठपुराव्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली—जेणेकरून दोषींना पळ काढता येऊ नये.
काय प्रकार घडला?
मिळालेल्या माहितीच्या आधारे, महापे MIDC परिसरातील एका गोदामात शिधावाटपाच्या तांदळाची बेकायदा विक्री सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
नियंत्रण अधिकारी नागरी पुरवठा, मुंबई यांनी तातडीने पथक तयार करून 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता धाड टाकली.
तेथे सरकारी तांदळाचे मोठ्या प्रमाणावर पोते, अवैध खरेदी-विक्रीचे पुरावे, अनधिकृत वाहतुकीसाठी वापरला जाणारा टाटा एस वाहन (एमएच 43 एच 1765) असे सर्व आढळले.
पथकाने वाहनचालक पिनू प्रसाद केरिया याला चौकशीअंती ताब्यात घेतले. केवळ 50% साठा गोदामातून काढला गेला असून उर्वरित 50% साठा ठाणे MIDC पोलीस स्टेशनमधून मिळाल्याच्या नोंदीही आढळल्या.
सरकारी धान्याचे लुटमार जाळे उघडकीस
चौकशीअंती समजले की, आरोपी स्वस्त धान्य दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर धान्य गोळा करत, ते महापे व गोणपाडे येथील गोदामांमध्ये साठवत आणि त्याची खुले बाजारात बेकायदा विक्री करत होते.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत अशा प्रकारची बेकायदेशीर विक्री गंभीर गुन्हा आहे.
आरोपींवर दाखल गुन्हा
ठाणे MIDC पोलीस ठाणे येथे वाहनचालक पिनू प्रसाद केरिया, गोदाममालक शिवलाल गहलोत, त्याचा सहकारी राजन सिंह या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वांवर बेकायदेशीर धान्य खरेदी-विक्री तस्करीचे गुन्हे (गुन्हा क्रमांक : 0444/2025
दिनांक : 21.11.2025) दाखल करण्यात आले आहेत.
अवैध धान्यविक्री करणाऱ्यांवर वज्र मुठ” — नागरी पुरवठा विभागाचा इशारा
नियंत्रक नागरी पुरवठा, मुंबई
चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.)
यांनी सांगितले की, “सरकारी शिधावाटपाचे धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गरीब जनतेच्या अन्नावर डल्ला टाकणाऱ्यांविरुद्ध कडकात कडक कारवाई केली जाईल. अशा कारवाया नियमितपणे सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृतीचा संदेश स्पष्ट—अशा बेकायदेशीर धंद्यांना आता ‘मार्ग बंद’
ही कारवाई केवळ एक छापा नाही तर भविष्यात अशा तस्करी करणाऱ्यांना थेट इशारा आहे की सरकारी धान्यावर डल्ला टाकल्यास नागरी पुरवठा विभाग आणि पोलीस विभाग कठोर कारवाई करणार.

