स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड राजकीय रंगत निर्माण झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. याला उत्तर देताना विरोधी आघाडीतील काँग्रेस आणि उभाठा गटानेही आक्रमक मोहीम उभी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूरच्या उदगीर आणि नांदेडच्या लोहा येथील सभा विशेष लक्षवेधी ठरल्या. त्यांच्या दौऱ्याचा प्रभाव भाजपच्या उमेदवारांच्या मोहिमेत स्पष्ट दिसून आला आहे. अयोध्येत पार पडलेल्या धर्मध्वज सोहळ्याचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेचा लाभ मराठवाड्यातील मतदारांमध्ये भाजपला मिळेल, असे पक्षनेत्यांचे मत आहे.
भाजप नेते आणि मंत्र्यांनी प्रत्येक सभेत केंद्र व राज्यातील विकासकार्यक्षम भूमिका अधोरेखित करत मतदारांशी संवाद साधला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही धाराशिव आणि नांदेडमध्ये मोठ्या सभांद्वारे आपली ताकद दाखवली. “तिजोरीची चावी आमच्याकडे आहे,” या त्यांच्या विधानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना (शिंदे गट) देखील मराठवाड्यातील निकालाला विशेष महत्त्व देत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आदेश दिले असून, मंत्री संजय शिरसाट यांनी विशेष मोर्चेबांधणी केली आहे. शिरसाट यांनी नांदेडमधील सभेत भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर केलेली टीका राज्यभर चर्चेत आहे. भाजपवर थेट टीका टाळत भाजपमधीलच काही नेत्यांना लक्ष्य केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अजित पवार गट मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात मजबूत जनसंपर्क करत आहे. परभणीतील भाजप नेत्या आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांना उभाठा गटाकडून तीव्र स्पर्धा मिळत आहे. बीडमधील पंकजा मुंडे यांच्यासाठीही ही निवडणूक कसोटीची ठरणार आहे. काही संवेदनशील भागांतील मतदान प्रक्रियेबाबत पक्षांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे, मात्र प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेसाठी आवश्यक खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लातूर आणि नांदेडवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही जिल्हे एकेकाळी काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात; महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारे हे जिल्हे आज काँग्रेसपासून दूर गेले आहेत. या दुरावस्थेवर मात करण्यासाठी सपकाळ जोरदार मोहीम राबवत आहेत.
हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये उभाठा गटाचे वर्चस्व असून, स्थानिक खासदारांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
एकूणच, मराठवाड्यात सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटातील खासदार–आमदारांसाठी ही खरी सत्वपरीक्षा आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदारांचे कल आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी सत्ताधारी गटातीलच काही नेते परस्परांविरुद्ध वक्तव्ये करत असल्याचे देखील दिसते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा मोठा विश्वास असल्याने मराठवाड्यात भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात मराठवाड्यात मोठा निधी उपलब्ध झाला असून, त्या निधीमुळे झालेल्या विकासकामांचा प्रभाव मतदारांवर दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचेच असतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
अडीच-तीन वर्षांनी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना यशस्वीपणे एकत्र आणतात, हे येणाऱ्या निकालांमधून स्पष्ट होणार आहे.
(लेखक डॉ. अभयकुमार दांडगे हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

