मुंबई – भारताची आदिम संस्कृती ही देशाचे वेगळेपण अधोरेखित करणारी जिवंत परंपरा आहे. मुंबईसारख्या धावत्या महानगरात राहणाऱ्या समाजालाही या संस्कृतीचे अप्रूप आणि अस्सल सौंदर्य जवळून अनुभवण्याची संधी शिवाजी पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रांगणात भरविण्यात आलेल्या ‘वनं आहार महोत्सवा’तून मिळाली.
येथे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पावरा आदिवासी समाजाच्या आहारशैलीचे, औषधी परंपरेचे आणि दुर्मिळ रानभाज्यांचे अनोखे प्रदर्शन पाहायला मिळाले. मुंबईतील अभ्यासू आणि संवेदनशील कुटुंबे आपला हा महान सांस्कृतिक ठेवा उत्सुकतेने अनुभवताना दिसले.
या उपक्रमाचे नियोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, पोश फाउंडेशन आणि दादर सांस्कृतिक मंच यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमात आदिवासी समाजाचे जीवनविश्व, त्यांच्या उपचारपद्धती, वनौषधींचे महत्त्व आणि शतकानुशतकांचा आहारशास्त्राचा वारसा प्रभावीपणे दाखविण्यात आला आहे.

नंदुरबारातील धडगाव तालुक्यातील अमोघ सटजे—उच्चशिक्षित असूनही मातीतल्या नाळेशी घट्ट जोडलेल्या—या तरुणाने आपल्या शेतातील उत्पादनांवर आधारित दुर्मिळ रानभाज्या, धान्ये आणि औषधी वनस्पतींचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विशेष म्हणजे, ते स्वतः किचनमध्येही लक्ष देत होते आणि प्रदर्शनाला येणाऱ्यांसाठी अस्सल आदिवासी आहार स्वतः बनवून देत होते. त्यांच्या कष्टामुळे मुंबईत क्वचितच मिळणारे आणि बहुतेकांना अज्ञात असलेले पदार्थ येथे स्वादिष्ट रूपात पाहायला आणि चाखायला मिळाले.
प्रदर्शनात हेवा (सुकी भाजी), शेवटा (ओली भाजी), कुतवला, वाज, काकडो, खांबण्या, आला, वाथाडो, शल्लकी, हाफ दुडको, बुंदारा, महुआ अशा अनेक रानभाज्यांसह विविध व्याधींवर परिणामकारक वनौषधी मांडण्यात आल्या होत्या.
प्रदर्शनाचा फेरफटका मारल्यानंतर पर्यटकांना ब्रेड जाम (रानफुलांचा), डोमखा चहा (रानफुलांचा चहा), कांद आबण्या (उकडलेला कंद), डुडान गाठ डाल (मक्याचा भात आणि मक्याचे वरण), हिता आथाणो (गव्हाचा डोसा आणि चटणी) यासारख्या दुर्मिळ आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता आला—जणू काही नंदनवनातील अनोखे सुख.
मुंबईकरांना आदिम जीवनशैली आणि निसर्गाशी एकरूप असलेल्या आहारसंस्कृतीचे दर्शन घडविणारा हा महोत्सव खरोखरच उल्लेखनीय ठरला.

