मुंबई — भिवंडी–निजामपूर महानगरपालिका हद्दीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर रखडलेला असल्याने या क्षेत्रासाठी ‘महाराष्ट्र स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण’मध्ये स्वतंत्र ‘भिवंडी सेल’ निर्माण करावा, अशी मागणी भिवंडी पूर्व मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदार व प्राधिकरणाध्यक्ष प्रवीण दरेकर यांना पत्राद्वारे केली.
राज्यात सुमारे १ लाख १५ हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था असून त्यातील मोठा हिस्सा मुंबई महानगर प्रदेशात आहे. भिवंडी–निजामपूरमधील संस्थांची संख्या उल्लेखनीय असतानाही, शासनाच्या सवलती आणि पुनर्विकासाच्या योजना या संस्थांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत, असे आ. शेख यांनी नमूद केले.
आमदार शेख म्हणाले, “भिवंडी–निजामपूर हे औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे असून सामाजिक–आर्थिकदृष्ट्या मागास मानले जाते. येथे लोकसंख्येची अत्यंत दाटी असून पायाभूत सुविधांचा दर्जाही चिंताजनक आहे. त्यामुळे पुनर्विकासाचा स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून वेग वाढवणे आवश्यक आहे.”
यासाठी त्यांनी पुढील ठोस उपाय सुचवले आहेत:
• भिवंडी–निजामपूरसाठी स्वतंत्र ‘भिवंडी सेल’ स्थापन करणे
• ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘विशेष समन्वय समिती’ गठित करणे
• नागरिक जागृतीसाठी प्रचार मोहिमा
• लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करणे
आमदार शेख यांनी सांगितले की, या मागणीबाबत त्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र सेल स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता दर्शविली आहे. त्यामुळे काही दिवसांतच या अनुषंगाने शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे.

