मुंबई – काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व एसटी डेपो प्रमुखांना कडक शब्दांत निर्देश दिले होते की, प्रवाशांना मूलभूत सुविधा देणे अत्यावश्यक आहे. विशेषत: बसस्थानकांवरील शौचालये स्वच्छ, नीटनेटकी आणि वापरण्यास योग्य असावीत; अन्यथा तक्रार आल्यास डेपो मॅनेजरलाच निलंबनाला सामोरे जावे लागेल, असा त्यांचा सक्त इशारा होता.
या इशाऱ्यानंतर अवघे काही दिवस होत नाहीत, तोच शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असताना सरनाईक यांनी अचानक एका एसटी डेपोला भेट देत शौचालयांची पाहणी केली. तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, दुर्गंधी आणि देखभालीचा पूर्ण अभाव दिसून आल्याने त्यांनी जागीच डेपो व्यवस्थापकाचे निलंबन करण्याचे आदेश दिले. “मी फक्त घोषणा करत नाही; तात्काळ कारवाई करतो,” असा थेट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
गेल्या आठवड्यातही सरनाईक यांनी याच डेपोला भेट देत पाणपोई, शौचालय, उपाहारगृह यांसह मूलभूत सुविधांची पाहणी केली होती. त्यांनी स्पष्ट सूचनाही दिल्या होत्या की, कोणतीही कसूर आढळल्यास थेट डेपो मॅनेजर जबाबदार धरला जाईल. तरीही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज त्यांनी स्वतः सोलापूर गाठून मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयांची पाहणी केली.
तिथे शौचालयाची डागडुजी न झालेली, फरशा उखडलेल्या, स्वच्छता ठेवलेली नसलेली, तसेच पाणपोई परिसरातही घाण आणि दुर्लक्ष दिसून आले. पाणपोईच्या पाच नळांपैकी केवळ एकच नळ सुरू होता. उपस्थित आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रक समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने, सरनाईक यांनी संबंधित व्यवस्थापकावर जबाबदारी निश्चित करून ताबडतोब निलंबनाचे निर्देश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले.
यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सर्व 251 आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरतेने पाहावे. प्रवाशांच्या सोयी–सुविधांबाबत, विशेषत: महिला शौचालयांच्या देखभालीबाबत कोणतीही निष्काळजीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही.

