मुंबई : जम्मू-कश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये ९ मे २०२५ रोजी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या अग्निवीर एम. मुरली नाईक यांच्या कुटुंबाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात एक महत्त्वाची रिट याचिका दाखल केली. ही याचिका शहीदाच्या आई श्रीमती ज्योतिबाई श्रीराम नाईक यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीमार्फत दाखल केली आहे.
याचिकेत नमूद केले आहे की, अग्निवीर सैनिक नियमित सैनिकांप्रमाणेच सीमेवर तैनात राहतात, समान जबाबदाऱ्या पार पाडतात आणि तेवढेच प्राणघातक धोकेही पत्करतात, तरीही शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना नियमित सैनिकांच्या तुलनेत समान पेन्शन, कल्याणकारी योजना आणि कुटुंब संरक्षण लाभ दिले जात नाहीत. हा भेदभाव असंवैधानिक आणि अन्यायकारक असल्याचे नमूद करून न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे.
याचिकेतील प्रमुख मागण्या : शहीद अग्निवीर कुटुंबांना नियमित सैनिकांप्रमाणेच मृत्यूनंतरचे सर्व लाभ प्रदान करावेत, कुटुंबांना दीर्घकालीन पेन्शन आणि संबंधित संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करावे, शहीद अग्निवीरांना समान संस्थात्मक मान्यता, आदर आणि कल्याणकारी दर्जा देण्यात यावा.
या प्रकरणात अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयात हजेरी लावली असून, अॅड. संदेश मोरे, अॅड. हेमंत घाडीगावकर आणि अॅड. हितेंद्र गांधी यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली आहे.
अग्निवीर योजनेअंतर्गत सेवेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांच्या हक्कांबाबत ही याचिका एक निर्णायक कायदेशीर प्रश्न उपस्थित करते. यामुळे भविष्यात देशभरातील इतर अग्निवीर कुटुंबांच्या कल्याणकारी हक्कांच्या पुनर्रचनेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

