नागपूर : राज्यातील ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच 8,000 नवीन बसेस खरेदी करणार असल्याची मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत केली. शिवसेना (ठाकरे गट) सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरनाईक म्हणाले, “एसटी ही उत्पन्न कमावण्याचे साधन नसून राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकांना पोहोचवणारी जनसेवा आहे.”
सरनाईक यांनी माहिती दिली की, पहिल्या टप्प्यात 3,000 बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, दुसऱ्या टप्प्यात 5,000 बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुढील 5 वर्षांत एकूण 25,000 बस टप्प्याटप्प्याने घेण्याची राज्य सरकारची योजना आहे.
महामंडळाच्या कामगारांबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “एसटी कामगारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. 4,190 कोटी रुपयांची थकीत देणी अदा करण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी पुरवणी मागणीतही निधीची तरतूद केली आहे.” त्यांच्या मते, येत्या 6 ते 8 महिन्यांत कामगारांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाचे डेपो आणि जागा PP मॉडेलवर विकसित करण्यात येतील, या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरले जाईल. महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पर्यायी स्रोत निर्माण करण्यात येत आहेत.
सरनाईक यांनी स्पष्ट केले की परिवहन विभागाचे उद्दिष्ट डिझेल बसेस कमी करून पर्यावरणपूरक पर्यायी बस (इलेक्ट्रिक/सीएनजी) वाढवण्याचे आहे.
या विषयावरील चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय, भाई जगताप, अनिल परब, प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

