महाराष्ट्र ताज्या बातम्या

Thane Election : ६० लाख मतदार, सहा महापालिका; ठाणे जिल्ह्यातील निकाल ठरवणार राज्याच्या राजकीय दिशेचा सूर

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता, राज्याच्या शहरी राजकारणाचा कणा कोणाच्या हाती जाणार याचा निर्णय देणाऱ्या ठरणार आहेत. मुंबईच्या सीमेलगत असलेल्या या जिल्ह्यात तब्बल ६० लाखांहून अधिक मतदार उमेदवारांचे आणि पक्षांचे भवितव्य ठरवणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या सहा महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सेमीफायनल ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

शहरी प्रश्न, नागरी सुविधा, वाहतूक, पाणीटंचाई, अनधिकृत बांधकाम, झोपडपट्टी पुनर्विकास, करप्रणाली आणि महिला सुरक्षेचे मुद्दे यावेळी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी ही निवडणूक सामंजस्याची कसोटी, तर विरोधकांसाठी राजकीय पुनरुज्जीवनाची संधी मानली जात आहे. विशेषतः ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांचे निकाल राज्याच्या राजकीय शक्ती-समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ही निवडणूक केवळ स्थानिक नसून राज्यस्तरीय महत्त्वाची राजकीय लढत ठरणार आहे.

कोणासाठी कसोटी?
• भाजपसाठी: शहरी मतदारांवरील पकड टिकते का, याची चाचणी
• शिवसेना (शिंदे/उबाठा): मूळ मतदार कुणाकडे आहे, याचा थेट निकाल
• राष्ट्रवादी काँग्रेस: शहरी भागात संघटन कितपत उभे राहिले आहे, याचा कस
• मनसे: मराठी मतांचे विभाजन की पुनरागमन, याची दिशा

महानगरपालिका निहाय राजकीय वजन
• ठाणे व कल्याण-डोंबिवली: सत्ता बदलाचे संकेत देणारे केंद्र
• नवी मुंबई: नियोजनबद्ध शहर, विकास विरुद्ध प्रशासनाचा मुद्दा
• मीरा-भाईंदर व उल्हासनगर: स्थानिक समीकरणे, जाती-धर्माचा प्रभाव
• भिवंडी-निजामपूर: अल्पसंख्याक मतदार निर्णायक भूमिकेत

महत्त्वाचे मुद्दे
• पाणीटंचाई, वाहतूक कोंडी
• अनधिकृत बांधकाम
• झोपडपट्टी पुनर्विकास
• मालमत्ता कर, कचरा व्यवस्थापन
• महिला सुरक्षेचा प्रश्न

राज्य राजकारणावर परिणाम

या सहा महापालिकांचे निकाल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ट्रेलर ठरणार आहेत. येथे जिंकणारा पक्ष आगामी काळात ‘राजकीय आघाडीचा नैरेटिव्ह’ ठरवेल, हे निश्चित.

महानगरपालिका निहाय मतदान केंद्रे व ईव्हीएमची संख्या

ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांमध्ये एकूण ६,९३० मतदान केंद्रे असून ५९,८०,३२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी ७,६२४ कंट्रोल युनिट्स आणि १५,४३२ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
• ठाणे महानगरपालिका : १,९४२ मतदान केंद्रे | मतदार – १६,४९,८६७, कंट्रोल युनिट – २,१३७ | बॅलेट युनिट – ४,२७४

• नवी मुंबई महानगरपालिका : १,११६ मतदान केंद्रे | मतदार – ९,४८,४९२, कंट्रोल युनिट – १,२२८ | बॅलेट युनिट – २,७९०.

• कल्याण-डोंबिवली महानगरपालिका : १,६१३ मतदान केंद्रे | मतदार – १४,२५,४६२, कंट्रोल युनिट – १,७७४ | बॅलेट युनिट – ३,५४८

• भिवंडी-निजामपूर महानगरपालिका : ७४५ मतदान केंद्रे | मतदार – ६,६९,०९३, कंट्रोल युनिट – ८२० | बॅलेट युनिट – १,४९०

• मीरा-भाईंदर महानगरपालिका : ९६४ मतदान केंद्रे | मतदार – ८,१९,८१३, कंट्रोल युनिट – १,०६० | बॅलेट युनिट – २,१२०

• उल्हासनगर महानगरपालिका : ५५० मतदान केंद्रे | मतदार – ४,६७,५९६,  कंट्रोल युनिट – ६०५ | बॅलेट युनिट – १,२१०

प्रभाग, सदस्य व मतदार आकडेवारी

ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका क्षेत्रांमध्ये एकूण १५९ प्रभाग, ६२७ नगरसेवक पदे असून ७,२०१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
• पुरुष मतदार : ३१,७२,०२७
• स्त्री मतदार : २७,७७,७९३
• इतर मतदार : १,३५१
• एकूण मतदार : ५९,५१,१७१

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे मतदान हे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे ठरविण्यास निर्णायक ठरणार असून, सहा महानगरपालिकांतील निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात