शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
मुंबई – “यंदाची मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार” अशा दर्पोक्ती करणाऱ्या भाजप नेत्यांना आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या भक्कम युतीमुळे आपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच भाजपने मुंबईतील प्रचारसभांमध्ये बिहार व उत्तर प्रदेशातून आणलेल्या गायिकांच्या अश्लील नृत्यांचा आधार घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आखिल चित्रे यांनी केला आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला.
चित्रे यांनी तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की, ज्या भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेचा हा व्हिडीओ आहे, त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मंचावर लावलेल्या स्पष्टपणे दिसतात. “महापुरुषांच्या प्रतिमांसमोर हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर नृत्यांगनांचे अश्लील नृत्य सुरू आहे आणि सभेत मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. हे दृश्य पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल,” असे ते म्हणाले.
दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपला आपला पराभव दिसत असल्यानेच गर्दी जमवण्यासाठी अशा प्रकारचा प्रचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “मागे कोणाच्या प्रतिमा आहेत याचे भान भाजप नेत्यांना उरलेले नाही. आमच्या महापुरुषांसमोर महिलांना नाचवून कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?” असा रोखठोक सवालही चित्रे यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात संबंधित भाजप उमेदवाराचे नाव घेत, चित्रे यांनी पवन त्रिपाठी यांच्यावरही निशाणा साधला. “हे स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे, तसेच माजी मुंबई भाजप अध्यक्ष व मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निकटवर्तीय आहेत. अशा व्यक्तींना सिद्धिविनायक ट्रस्टसारख्या पवित्र संस्थेत कोषाध्यक्षपदावर नेमताना भाजपला लाज कशी वाटली नाही?” असा सवाल त्यांनी केला.
चित्रे यांनी थेट मुंबईकर मराठी माणसांना आवाहन करत म्हटले, “आता महापुरुषांचा अपमान सहन करण्याची वेळ संपली आहे. सत्तेच्या मस्तीने वागणाऱ्यांना ‘शिवटोला’ देण्याची संधी वारंवार मिळत नाही.”
उद्धव ठाकरे गटाच्या युवा नेत्याच्या या आरोपांना मुंबईतील मतदार कसा प्रतिसाद देतात, की सत्ताधाऱ्यांच्या प्रचारामागेच जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

