महाराष्ट्र ताज्या बातम्या

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विकासाऐवजी ‘लक्ष्मी दर्शन’ चर्चेचा केंद्रबिंदू

महाड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात विकासकामे, कामगिरी आणि लोकहिताच्या मुद्द्यांपेक्षा वेगळ्याच चर्चांना उधाण आल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. “दाम करी काम, लक्ष्मी करी सलाम” ही म्हण या निवडणूक वातावरणात पुन्हा एकदा आठवण करून देणारी ठरत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाची तारीख ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी करण्यात आल्याने अनेक मतदारांचे आधीच ठरवलेले प्रवास व सुट्टीचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक आदी शहरांत कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या मतदारांनी गावी येण्यासाठी ५ फेब्रुवारीची रजा घेतली होती. खाजगी वाहतूक, एसटी महामंडळ व रेल्वेची तिकीट बुकिंगही अनेकांनी आधीच केली होती.

मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलली. या निर्णयामुळे मतदारांना पुन्हा प्रवासाची व्यवस्था करावी लागत असून, वाढलेल्या नियोजनाचा ताण स्पष्टपणे जाणवत आहे.

याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात निवडणूक वातावरणात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे. मतदानासाठी गावी येणाऱ्या मतदारांकडून ‘लक्ष्मी दर्शनाची अपेक्षा’ व्यक्त केली जात असल्याची कुजबुज अनेक गावांत ऐकायला मिळत आहे. मतदानाच्या तारखेत झालेल्या बदलामुळे वाढलेल्या खर्चाची भरपाई कशी होणार, यावरून ही अपेक्षा व्यक्त होत असल्याचे स्थानिक पातळीवरील निरीक्षक सांगतात.

गावोगावी सुरू असलेल्या या चर्चांमुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवरही दबाव वाढल्याचे दिसून येत आहे. मतदारांचे समाधान, प्रवासातील अडचणी आणि निवडणूक काळातील अलिखित समज यांचा उल्लेख करत ‘लक्ष्मी दर्शन’ ही संज्ञा चर्चेचा विषय ठरत आहे. परिणामी विकासकामे, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न मागे पडत चालल्याचे चित्र काही भागांत दिसून येत आहे.

विकास मागे, संकेत पुढे

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये उमेदवारांच्या प्रचारादरम्यानही या चर्चांचा प्रभाव जाणवत आहे. विकासाच्या आश्वासनांपेक्षा निवडणूक काळातील सामाजिक-राजकीय संकेत, अपेक्षा आणि समजुती यांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना अनेक मतदार व्यक्त करत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत लोकशाहीचा खरा अर्थ आणि विकासकेंद्रित राजकारण टिकून राहणार की नाही, हा प्रश्न अशा चर्चांमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. “दाम करी काम, लक्ष्मी करी सलाम” ही म्हण केवळ म्हण म्हणून न राहता, सध्याच्या निवडणूक वास्तवाचे सूचक चित्रण करत असल्याची भावना ग्रामीण भागात उमटताना दिसत आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात