एस.टी. महामंडळाचे स्पष्टीकरण
मुंबई – मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्यानजीक ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक करणारा एक टँकर भररस्त्यात आडवा झाल्याने तब्बल २२ तासांहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा जबर फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बससेवेलाही बसला. त्यामुळे महामंडळाला एकूण १३९ बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, असे स्पष्टीकरण बुधवारी महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आले.
राज्य मार्ग परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांतील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ३७ ई-शिवनेरी बस फेऱ्या आणि ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश असल्याची सविस्तर माहिती देण्यात आली.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असे आवाहन महामंडळ प्रशासनाने केले आहे.

