मुंबई: हिंदू तत्त्ववेत्ता, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदू महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर ज्या वास्तूमध्ये वास्तव्यास होते, त्या सावरकर सदन या वास्तूचा ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करणे आवश्यक असल्याचे मत हिंदू महासभेने व्यक्त केले आहे.
सद्यस्थितीत सावरकर सदनचा समावेश राष्ट्रीय वारसा वास्तूंच्या यादीत नसला, तरी मुंबई महापालिका किंवा राज्य शासनाच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत ही वास्तू समाविष्ट करता येऊ शकते, असे भारतीय पुरातत्त्व विभागाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याचे महासभेने सांगितले. तसेच राज्य शासनाने यापूर्वीच सावरकर सदन वारसा वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्याची भूमिका घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
हिंदू महासभेने राज्य शासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले असून, सावरकर सदन पाडणे शक्य नाही, हे यामुळे स्पष्ट झाल्याचे महासभेचे म्हणणे आहे. पुनर्विकासाच्या मुद्द्यावर २६ फेब्रुवारी (सावरकर आत्मार्पण दिनी) सावरकर सदनातील रहिवाशांशी हिंदू महासभेच्या वतीने भेट घेऊन संवाद साधण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले.
महासभेने असेही नमूद केले की, स्वातंत्र्यपूर्व काळात अखंड हिंदुस्थानातील देशभक्तांना सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्याची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरतात. मात्र ही ओळख पुसण्याचा प्रयत्न आजही होत असल्याचा आरोप करत, तो हाणून पाडणे राष्ट्रहिताचे असल्याचे मत महासभेने व्यक्त केले.
स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी राष्ट्रीय नेत्याचे वास्तव्य असलेले सावरकर सदन ही ऐतिहासिक वास्तू ठरते, असे महासभेचे म्हणणे आहे. साधारण इमारतींसाठी लागू असलेला शंभर वर्षांचा नियम सावरकर सदनसारख्या ऐतिहासिक वास्तूसाठी लागू करणे अयोग्य असल्याचेही महासभेने स्पष्ट केले.
सावरकर सदनला राष्ट्रीय वारसा दर्जा देण्याच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी हिंदू महासभा अभियान राबवत असून, या अभियानात सावरकरनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संस्थांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन महासभेने केले आहे.

