मुंबई: मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्ष–शिवसेना सत्तेत आल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाचा निर्णय घेतला जाणार आहे. विरोधी बाकावर बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद येणार असून, ही जागा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या कोट्यातून मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या पदावर कोणाची नेमणूक करायची याचा अंतिम निर्णय मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आणि पक्षातील ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर घेणार आहेत.
या पदासाठी तिघांची नावे चर्चेत असली, तरी मनसे विद्यार्थी सेनेचे चेतन पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आक्रमक नेते अशी ओळख असलेले चेतन पेडणेकर यांनी २०१७ मध्ये वॉर्ड क्रमांक २०६ मधून निवडणूक लढवली होती.
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या “अन्य भाषिक शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीने शिकवली जावी” या मोहिमेत चेतन पेडणेकर यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
दरम्यान, मागच्या महापालिका निवडणुकीत अवघी १४०० मते मिळवलेल्या चेतन पेडणेकर यांची वर्णी लागणार असल्याने पक्षात अस्वस्थता आहे. पाठीमागे एकही कार्यकर्ता नसलेले पेडणेकर केवळ पक्ष नेतृत्वाच्या स्वीय सहायकाच्या मर्जीतील असल्याने पेडणेकर यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागत असल्याची टीका पक्षातून केली जात आहे.

