महाराष्ट्र ताज्या बातम्या

आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

पोलादपूर पोलिसांचा कसून तपास सुरू; हत्या असल्याची प्राथमिक शक्यता

महाड: पोलादपूर–महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात, पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आला. या धक्कादायक व संशयास्पद घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासात ही हत्या असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

आंबेनळी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागल्याने त्यांनी रस्त्यालगत असलेल्या मोरीत पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. प्राथमिक तपासात मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोरीत टाकण्यात आल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे २८ ते ३० वर्षांदरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मागील काही दिवसांत बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचा आढावा घेतला जात आहे. तसेच मोबाईल लोकेशन, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

आंबेनळी घाट हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेमुळे पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी आणि या घटनेचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी केली आहे. पोलादपूर पोलिसांकडून तपास युद्धपातळीवर सुरू असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात