मुंबई: युवा चित्रपट निर्मात्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नॅशनल स्टुडंट्स फिल्म फेस्टिव्हल (NSFF) 2026 च्या पाचव्या पर्वाचे आयोजन 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय महोत्सव ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे पार पडत आहे.
हा महोत्सव राष्ट्रीय कला मंच – अभाविप आणि विद्यार्थी निधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, एसएनडीटी विमेन्स युनिव्हर्सिटी, आयआयएम मुंबई, फिल्म सिटी मुंबई तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC) यांच्या सहकार्याने तो संपन्न होत आहे.
उद्घाटन सत्र सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी उद्यावर, स्वागत समिती सचिव राज कांबळे, अभाविप राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, राष्ट्रीय कला मंच संयोजक अभिनव दीप आणि NSFF संयोजक सौम्या चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक NSFF संयोजक सौम्या चौरे यांनी केले. स्वागत समिती सचिव राज कांबळे यांनी विद्यार्थ्यांना NSFF विषयी सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय कला मंच संयोजक अभिनव दीप यांनी राष्ट्रीय कला मंचाच्या उद्दिष्टांची आणि कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
प्रसिद्ध दिग्दर्शक रवी उद्यावर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “चांगला दिग्दर्शक होण्यासाठी स्वतःमधील लहान मूल जिवंत ठेवणे आवश्यक आहे. लोकांशी संवाद साधणे, भारत भ्रमण करणे आणि भारताच्या इतिहासातील दडलेल्या कथा शोधून त्या जगासमोर मांडणे गरजेचे आहे.”
अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनाके यांनी सांगितले की, “चित्रपट हे केवळ ग्लॅमरचे माध्यम नसून चरित्र घडविण्याचे प्रभावी साधन आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद युवकांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देत जांबुवंताची भूमिका बजावत आहे. राष्ट्रीय कला मंच भारतीय संस्कृतीच्या अभिव्यक्तीसाठी सातत्याने कार्यरत आहे.”
उद्घाटन सत्राला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवा चित्रपटप्रेमी उपस्थित होते. उपस्थित युवाशक्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

