मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणात प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना निलंबित करण्यात येणार, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री Ashok Uikey यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.
या संदर्भात भाजप सदस्य Sanjay Kelkar यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार Kisan Kathore यांनीही या प्रकरणात संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.
मंत्री उईके यांनी उत्तरात सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रकल्पस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीच्या अहवालानुसार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
पाणंद रस्त्यांची मोजणी वेगाने; खासगी भूकरमापक नियुक्त होणार
दरम्यान, राज्यातील पाणंद रस्त्यांची मोजणी व सीमांकन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी खासगी भूकरमापक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी विधानसभेत दिली.
गावांमधील प्रत्येक पाणंद रस्त्याची मोजणी करून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्यात येणार आहे. तसेच या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून त्यांची एकत्रित नोंद ठेवली जाईल. प्रत्येक पाणंद रस्त्याला सांकेतिक क्रमांक देऊन गावाचा नकाशा ग्रामसभेत सादर करण्यात येणार आहे.
या संदर्भात सदस्य Sameer Kunawar आणि Prashant Bamb यांनी मोजणी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी केली.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील १ लाख ७४ हजार ६७४ पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ९५ हजार ५६४ रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. पाणंद रस्त्यांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ ३१ मार्चपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

