महाड – किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळील लाकडी बॅरिकेटर तुटून त्याला कापडी चिंध्यांनी बांधल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड भेटीपूर्वीच संबंधित बॅरिकेटरची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने लाकडी बॅरिकेटर उभारण्यात आले आहेत. मात्र या बॅरिकेटरला तडे जाऊन ते चिंध्यांनी बांधले असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर रायगड प्राधिकरण, पुरातत्व विभाग आणि प्रशासनावर टीका होऊ लागली.
दरम्यान, ९ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करणार असल्याची घोषणा आधीच करण्यात आली होती. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व विभागावर टीका करतील, अशी चर्चा सुरू होती.

या पार्श्वभूमीवर तुटलेल्या बॅरिकेटरची दुरुस्ती तातडीने करण्यात आल्याने राज ठाकरेंच्या भेटीच्या आधीच प्रशासनाला जाग आली का? असा सवाल उपस्थित होत आहे.
यापूर्वीही रायगड प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या सुमारे ६०० कोटी रुपयांच्या विकासकामांवर निकृष्ट दर्जाबाबत आरोप झाले होते. त्यामुळे रायगडावरील सुविधांच्या देखभालीबाबत प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, रायगड किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी नामांकन मिळालेल्या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांपैकी एक असून, या किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडूनही सांगितले जात आहे.
Alternative stronger:

