मुंबई : नगर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून कार्यरत असताना गंभीर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याला अधीक्षकपदी बढती कशी देण्यात आली, असा सवाल करत या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
वडेट्टीवार हे २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. गृह विभागाच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनातील अनियमिततांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
ते म्हणाले की, नगर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना एका अधिकाऱ्यावर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) देखील ठपका ठेवला होता. अशा अधिकाऱ्याला अधीक्षकपदी बढती कशी देण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बीड जिल्ह्यात घडलेल्या काही गंभीर घटनांचाही त्यांनी उल्लेख केला. राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत तोंडी परीक्षेचे निकष पाळले गेले नसल्यामुळे तीनशे ते चारशे युवकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय त्यांच्या जिल्ह्यात पाचशे रुपयांच्या ९१ लाखांच्या बनावट नोटांचे प्रकरण समोर आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्यात एका शिपायाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर धावून गेल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला.
पुण्यात अधीक्षक अभियंता पदावर बढती दिलेल्या एका महिला अधिकाऱ्याला निवडणुकीदरम्यान नातेवाईक उमेदवारासाठी पैसे वाटप करताना पकडण्यात आले होते. अशा अधिकाऱ्याला बढती कशी देण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत सरकार बोलत असले तरी आतापर्यंत किती शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला, याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
उत्तर महाराष्ट्रातील बोधवड प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यात दाखवण्यामागे कोण आहे, तसेच विदर्भाच्या निधीवर कोण डल्ला मारत आहे, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामुळे ३५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार होती. मात्र प्रत्यक्षात १५ हजार हेक्टर जमिनीला अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलन करत असून या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

