मुंबई – मुंबईतील मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) सिमेंट प्लांटवर दंडात्मक कारवाई आणि खटले दाखल करण्यात येतील, अशी ग्वाही पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.
सदस्य Abu Azmi यांनी मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील एसएमएस एन्व्होक्लीन कंपनीच्या कचरा जाळण्याच्या यंत्रणेमुळे आणि RMC प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली असून त्यात सदस्य अबू आझमीही उपस्थित होते.
मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील एसएमएस एन्व्होक्लीन कंपनीची भस्मीकरण (इन्सिनरेशन) यंत्रणा अंबरनाथ औद्योगिक वसाहतीत २१ महिन्यांच्या आत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोवंडी परिसरातील डंपिंग ग्राउंड आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत काही संस्थांनी न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. त्यानंतर प्रकल्प सध्याच्या ठिकाणाहून हलविण्याचा निर्णय घेण्यात आला असून न्यायालयाने दिलेल्या मुदतीत स्थलांतर पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
परिसरातील RMC सिमेंट प्लांटबाबतही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देताना मुंडे म्हणाल्या की, आठ केंद्रांपैकी नियमांचे पालन न करणाऱ्या चार केंद्रांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या केवळ चारच केंद्रे कार्यरत आहेत.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
भस्मीकरण प्रकल्पासाठी सुरुवातीला पाताळगंगा आणि खालापूर परिसराचा विचार करण्यात आला होता; मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. आता अंबरनाथ एमआयडीसी क्षेत्रात नवीन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असून नियोजित कालावधीत स्थलांतर पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

