मुंबई : महाराष्ट्राचा औद्योगिक विकास समतोल पद्धतीने व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून दावोस दौऱ्यात झालेले करार आणि राज्यात आलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीबाबत लवकरच ‘भगवी पत्रिका’ (Saffron Paper) जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.
विरोधी पक्षांच्या नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. त्यांनी सांगितले की, २०२६ मध्ये राज्यात तब्बल ३१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यापैकी उद्योग विभागात १५ लाख कोटी रुपये, एमआयडीसीमध्ये १५ लाख कोटी रुपये आणि एमएसआरडीसीमध्ये १ लाख कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली आहे.
महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांपासून थेट विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना सामंत म्हणाले की, २०२२ मध्ये मुंबई महापालिकेच्या कायम ठेवी सुमारे ९१ हजार कोटी रुपये होत्या, मात्र कोरोना संकटामुळे विकासकामे ठप्प झाल्याने त्या ठेवींचा वापर कमी झाला. पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च केला जातो. शहरात २७८ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
महापालिकेच्या ठेवीतून वेतनाचा खर्च केला जात नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, सध्या महापालिकेच्या ठेवी सुमारे ८१ हजार कोटी रुपये आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या हाती कारभार असल्याने ते आपली जबाबदारी पार पाडतील, असेही ते म्हणाले.
मिठी नदी स्वच्छता प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी ६५ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. या प्रकरणात साडेतीन लाख छायाचित्रांपैकी दोन लाख छायाचित्रांची तपासणी सुरू असून, एकाच डंपर किंवा ट्रॅक्टरचा वापर वारंवार केल्याचे आढळल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे शहर असून शहरातील मोठ्या प्रकल्पांसाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

