महाराष्ट्र ताज्या बातम्या

निमित्त ‘शतक’चे : रॉक्सी चित्रपटगृहात भरली संघाची शाखा

Yogesh Vasant Trivedi, senior political analyst and columnist

– By योगेश वसंत त्रिवेदी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदाचे शंभरावे वर्ष सुरू आहे. त्यामुळे संघाच्या उदात्तीकरणासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोणतीही कसूर राहणार नाही, हे जवळपास निश्चितच आहे. २०१४ पासून आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राजकीय मान्यता मिळाल्याचे दिसते. नोंदणीकृत नसलेल्या (सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मते) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकमहोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून खालच्या पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

शताब्दी वर्षानिमित्त १०० रुपयांचे विशेष नाणे तसेच अखंड भारताच्या स्वरूपातील भारतमातेचे नाणेही प्रकाशित करण्यात आले आहे. त्याचबरोबर संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘शतक’ हा माहितीपट/चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. आशिष मल्ल दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेते अजय देवगण यांनी निवेदकाची भूमिका साकारली असून संघाचा इतिहास आणि त्याग यांचा आढावा त्यातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती वीर कपूर यांनी केली आहे.

या चित्रपटाचा एक विशेष खेळ ऑपेरा हाऊस येथील ‘रॉक्सी मुक्ता ए-२’ या चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. हा खेळ मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी होता. एरव्ही मैदानात भरली जाणारी संघाची शाखा जणू चित्रपटगृहात भरल्याचा अनुभव या कार्यक्रमात उपस्थितांना आला.

चित्रपट सुरू होण्यापूर्वी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना ‘दक्ष आरम’ असा आदेश दिला. ‘सावधान-विश्राम’नंतर संघाची प्रार्थना ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ सर्वांनी शाखेत उभे असल्याप्रमाणे हात छातीशी घेऊन म्हटली. त्यानंतर पुन्हा ‘दक्ष आरम’ झाल्यानंतर ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत झाले आणि मग पूर्ण लांबीचा ‘शतक’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

चित्रपट पाहताना संघाच्या संपूर्ण शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र कथानक मुख्यतः संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, त्यानंतरचे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) आणि मधुकर उर्फ बाळासाहेब देवरस यांच्या प्रारंभीच्या काळावर केंद्रित असल्याचे दिसते. त्याचबरोबर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाचा उल्लेख आणि राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेचा संदर्भही चित्रपटात येतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग किंवा केंद्र सरकारशी संबंध नसल्याचा दावा अनेकदा केला जातो. मात्र चित्रपटात संघाच्या कार्याचा व्यापक प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न दिसून येतो. उदाहरणार्थ, तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विनंतीनंतर स्वयंसेवकांनी पाकिस्तानविरुद्ध मदत केल्याचा प्रसंगही दाखविण्यात आला आहे.

संघाच्या नेतृत्वाचा इतिहास पाहता, स्थापनेपासून आतापर्यंत सहा सरसंघचालक झाले आहेत — डॉ. केशव बळीराम हेडगेवार (१९२५-१९४०), माधव गोळवलकर (१९४०-१९७३), मधुकर देवरस (१९७३-१९९४), प्रो. राजेंद्र सिंह (१९९४-२०००), के. एस. सुदर्शन (२०००-२००९) आणि डॉ. मोहन भागवत (२००९ पासून आजपर्यंत). या नेतृत्वाच्या परंपरेचा काही अंश चित्रपटात दिसतो.

मात्र अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी किंवा नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीवर चित्रपटात विशेष प्रकाशझोत टाकलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात संघाच्या स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिल्याचा दावा केला जात असला तरी भाजपचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघाचा पक्षाशी औपचारिक संबंध नसल्याचेही म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर ‘शतक’ या चित्रपटामुळे संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसते. त्याचवेळी राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही आपल्या इतिहासाचे चित्रण करणारे चित्रपट निर्माण करण्याची गरज असल्याची चर्चा काही ठिकाणी व्यक्त होत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत जाण्यावरील बंदीही केंद्र सरकारने अलीकडेच उठविली आहे. त्यामुळे भविष्यात सार्वजनिक ठिकाणी, अगदी मंत्रालयासारख्या सरकारी परिसरातही संघाच्या शाखा भरल्यास आश्चर्य वाटू नये, अशी प्रतिक्रिया काही राजकीय निरीक्षक व्यक्त करतात.

एकूणच संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक’ या चित्रपटाच्या निमित्ताने संघाच्या इतिहास आणि प्रभावाबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पुढील काळात या विषयावर आणखी काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जय लोकशाही!


— योगेश वसंत त्रिवेदी
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात