मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुमारे २३ हजार किलोमीटर नवे रस्ते बांधण्यात येणार आहेत, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली.
विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री गोरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत आतापर्यंत १६,९७२ किलोमीटर रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून त्यासाठी ७,२८० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आणखी १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ४० नवीन ग्रामपंचायतींना मंजुरी देण्यात आली असून ८४ तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर काम झाले असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २९ लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर घरे मंजूर झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचा दावा मंत्री गोरे यांनी केला.

