महाराष्ट्र ताज्या बातम्या शोध बातमी

बदलापूर: राजकारणापलीकडची माणसं

बदलापूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह

राम पातकर, श्रीधर पाटील, किरण भोईर आणि इतर लोकप्रतिनिधींच्या सामाजिक कार्यातून घडलेली बदलापूरची वेगळी ओळख.

बदलापूर… एक सुसंस्कृत शहर.
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली आणि बदलापूर या दोन शहरांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलापूरच्या या जडणघडणीत अनेक स्थानिक घराणी, नागरिक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. काही अपवाद वगळता आपटे, गोळे आणि (मला माहीत नसलेल्या) अशा असंख्य मूळ कुटुंबांनी या शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रवासात योगदान दिले आहे.

मी स्वतः २००३ मध्ये बदलापूरमध्ये आलो. माझी पत्नी बदलापूरचीच — त्यातही गणेश चौकातील. त्यामुळे या शहराशी जुळलेली पहिली ओळख झाली ती श्रीधर पाटील यांच्याशी. सडपातळ शरीरयष्टी, चेहऱ्यावरचे तेज आणि सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेली व्यक्ती. कचरा मुक्त वॉर्डसाठी घेतलेला पुढाकार, वाचक चळवळ उभी करणे, लेखक आणि मान्यवरांना बदलापूरमध्ये बोलावून कार्यक्रम आयोजित करणे — या सगळ्यामुळे श्रीधर पाटील यांची प्रतिमा ही केवळ नगरसेवक किंवा राजकारणी अशी मर्यादित राहिली नाही; तर एक उत्तम समाजसेवक म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली.

याच काळात शहरभर काही पोस्टर्स लागलेली दिसायची. “युवा” अशा काहीशा नावाने कार्यक्रम आयोजित करणाऱ्या त्या पोस्टर्सवर एक चेहरा कायम असायचा — कॅप्टन आशिष दामले. त्यांच्या विविध उपक्रमांचे मलाही आकर्षण वाटायचे. पुढे त्यांनी अवघ्या १० रुपयांत जेवण देणारे “ताईज किचन” सुरू केले. त्यावेळी मी त्याची बातमी केली आणि कॅप्टन दामले यांच्याशी मैत्रीचे धागे जोडले गेले. विशेष म्हणजे पुढे ही संकल्पना राज्य शासनानेही स्वीकारली. आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या दामले यांना आज थेट मंत्रिपदाचा दर्जा लाभला आहे.

खेळ आणि समाज यांच्यातील नातं अधिक मजबूत करण्यासाठी स्पर्धेत स्वतः सहभागी होताना किरण भोईर.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत एक युवा उद्योजक नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बाजारपेठ परिसरात त्यांची पोस्टर्स दिसायची. किरण भोईर — असे त्या युवा उद्योजक आणि नगरसेवकाचे नाव. आजही ते भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले आहेत आणि आरोग्य सभापती आहेत. 

किरण भोईर यांच्या कार्याविषयी ऐकून मलाही या तरुणाबद्दल आकर्षण निर्माण झाले होते; मात्र प्रत्यक्ष ओळख किंवा भेट झाली नव्हती. किरण यांच्याकडे पाहिल्यावर कोणीही त्यांना पारंपरिक अर्थाने “राजकारणी” म्हणणार नाही. आपल्या मनात राजकारण्याचे एक ठराविक चित्र तयार झालेले असते — राकट चेहरा, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हातात जाड कडे, प्रत्येक दोन वाक्यांमागे एखादी शिवी, बोलण्यात उद्धटपणा… पण यापैकी एकही विशेषण किरण भोईर यांना लागू पडत नाही.

अर्थात, सर्वच राजकारणी असे असतात असे नाही. आपल्या आसपास अनेक चांगले, सुसंस्कृत आणि सभ्य लोकप्रतिनिधी आपण पाहतो. हीच तर आपल्या समाजाची आणि संस्कृतीची खरी ताकद आहे.

किरण भोईर यांनी नुकतीच बदलापूरमध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे अत्यंत यशस्वी आयोजन केले. ही मूळतः शासनाची स्पर्धा असली, तरी शासकीय आयोजनात एखाद्या खाजगी व्यक्तीचा सक्रिय आणि संवेदनशील सहभाग असेल, तर कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतो, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

सहसा राज्य शासनाचे क्रीडा स्पर्धांसाठीचे बजेट मर्यादित असते. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था एखाद्या शाळेत, वसतिगृहात किंवा साध्या ठिकाणी केली जाते. मात्र किरण भोईर — जे स्वतः राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आहेत — त्यांनी या खेळाडूंसाठी एका उत्तम रिसॉर्टमध्ये निवासाची व्यवस्था केली. ग्रामीण भागातून आलेल्या अनेक मुलांनी आयुष्यात प्रथमच असा रिसॉर्ट आणि त्यातील स्विमिंग पूल पाहिला. उत्तम जेवण, स्वच्छ व्यवस्था आणि स्पर्धेच्या मैदानापर्यंत येण्या-जाण्यासाठी बसची सुविधा — या सगळ्यामुळे स्पर्धकांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि समाधान दिसून येत होते.

त्याचा परिणाम स्पर्धांवरही दिसला. सामने अत्यंत जोशात आणि स्पर्धात्मक वातावरणात पार पडले. घोरपडे मैदानावर किरण भोईर यांनी तब्बल चार स्वतंत्र व्हॉलीबॉल कोर्ट्स तयार करून घेतले होते. क्रीडा क्षेत्र कव्हर करणाऱ्या अनेक पत्रकारांनीही “अशा दर्जाची व्यवस्था आणि मैदान महाराष्ट्रातील फार कमी शहरांत पाहायला मिळते,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यातूनच या आयोजनाची व्याप्ती आणि गुणवत्ता स्पष्ट होत होती.

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या CEOसारखे व्यक्तिमत्त्व असलेले किरण भोईर यांचा सामाजिक कार्याचा आवाका मात्र केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाही. बदलापूरसारख्या वाढत्या शहरात सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा समतोल साधणारे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते — आणि म्हणूनच किरण भोईर यांच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीकडे अनेक जण आशेने पाहतात.

कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी घराघरात सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रम राबविताना श्रीधर पाटील.

किरण भोईर यांच्या सामाजिक कार्याचा आवाका किती व्यापक आहे, याची प्रचिती त्यांच्या विविध उपक्रमांकडे पाहिल्यावर येते. राजकारणाच्या चौकटीत राहूनही समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी सातत्याने दिसून येते.

आजपर्यंत तब्बल १७०० मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. मुलींच्या जन्माकडे केवळ कौटुंबिक आनंद म्हणून न पाहता, समाजाच्या भविष्यातील गुंतवणूक म्हणून पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. त्याच भावनेतून त्यांनी सुमारे ९०० मुलींची ‘सुकन्या समृद्धी योजना’ अंतर्गत खाती सुरू करून त्याचा पहिला हप्ता स्वतः भरला आहे.

गेल्या सात वर्षांपासून त्यांनी क्षयरोगमुक्त समाजासाठी एक वेगळी जबाबदारी स्वीकारली आहे. क्षयरोगग्रस्त रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार पुरविण्याचा उपक्रम त्यांनी सातत्याने सुरू ठेवला आहे. आतापर्यंत ७३५ रुग्णांना दत्तक घेण्यात आले असून प्रत्येक रुग्णाला सहा महिन्यांपर्यंत संपूर्ण पोषण आहार दिला जातो. विशेष म्हणजे मार्च महिन्यापासून बदलापूरमधील शंभर टक्के क्षयरुग्ण दत्तक घेण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला आहे.

मागील वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रुग्णवाहिका सेवा सुरू केली. ही सेवा कमी दरात उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक रुग्णांचा सुमारे ४० टक्के खर्च वाचत आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या रुग्णांना बदलापूरमधील रुग्णालयांमध्ये नेण्यासाठी मोफत सेवा देखील पुरविली जाते.

आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान इथेच थांबत नाही. आतापर्यंत १०० हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांनी स्वखर्चाने करून दिल्या आहेत. तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही वेळोवेळी आर्थिक मदत केली जाते.

आजच्या काळात राजकारणात प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष काम अधिक महत्त्वाचे मानणारे लोकप्रतिनिधी कमी होत चालले आहेत. अशा वेळी किरण भोईर यांच्यासारखे तरुण नेतृत्व बदलापूरसारख्या शहराला केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक अर्थानेही वेगळी ओळख देत आहे.

अर्थात, बदलापुरात असे काम करणारे एक-दोनच लोकप्रतिनिधी आहेत असे नाही. या शहराच्या जडणघडणीत अनेकांनी आपापल्या परीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माजी नगराध्यक्ष Ram Patkar — जे पूर्वी Mumbai Metropolitan Region Development Authority चे सदस्य होते — यांच्या दूरदृष्टीमुळे बदलापूरच्या विकासाला एक दिशा मिळाली. संभाजी शिंदे यांचा शहरी समस्यांवरील अभ्यास, शैलेश वडनेरे यांचे सामाजिक कार्य, श्रीधर पाटील आणि वामन म्हात्रे यांनी कोविड काळात स्वतः रस्त्यावर उतरून रुग्णांसाठी केलेली सेवा, तसेच आमदार Kisan Kathore यांचा शहर विकासाचा ध्यास — हीच आज बदलापूरची खरी ओळख आहे.

खरे तर एखाद्या शहराची ओळख फक्त मोठ्या इमारतींनी किंवा रस्त्यांनी निर्माण होत नाही. ती घडते माणसांमुळे, त्यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या वृत्तीमुळे. बदलापूरची ताकदही हीच आहे.

किरण भोईर यांच्या शनिवार, दिनांक २३ रोजी साजऱ्या झालेल्या वाढदिवसानिमित्त हा लेख लिहिण्याची संधी मिळाली. बदलापुरात असे अनेक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी असतील जे उत्तम काम करत आहेत; कदाचित मला अजून त्यांचा परिचय झाला नसेल. मात्र शहराच्या विकासात आणि सामाजिक आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किरण भोईर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा — आणि इतर सर्व लोकप्रतिनिधींनाही त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात