9 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आंदोलनावर पोलिसांचा गोळीबार; कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांनी गमावला होता जीव
मावळ : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आदरांजली वाहण्यात आली. या घटनेला 15 वर्षे पूर्ण होत असताना मावळातील त्या संघर्षाच्या आणि पोलिस गोळीबाराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या प्रस्तावाला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. जलवाहिनीमुळे शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर परिणाम होईल, अशी शेतकऱ्यांची भीती होती. या प्रकल्पाविरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी मोठ्या संख्येने शेतकरी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर उतरले होते. आंदोलनादरम्यान परिस्थिती चिघळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांचा मृत्यू झाला, तर अनेक आंदोलक जखमी झाले होते.
या घटनेने त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे गोळीबार झाला त्या काळात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. मावळातील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद विधानसभेत आणि विधान परिषदेत उमटले. विरोधकांनी सरकारला धारेवर धरत चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली. या प्रश्नावर विधानसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले, तर विधान परिषदेतही गदारोळ झाला होता. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अखेर निवृत्त उच्च न्यायालयीन न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली होती.
गोळीबाराच्या वेळी संदीप कर्णिक हे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते. त्यानंतर राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी आयोगाची नियुक्ती केली. आयोगाने पोलिस गोळीबाराची आवश्यकता नव्हती आणि पोलिसांनी आपल्या अधिकारमर्यादेच्या पलीकडे कारवाई केली, असा निष्कर्ष नोंदवला होता. आयोगाच्या निष्कर्षांमध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्यासह चार पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ठपका ठेवण्यात आला होता.
मावळ गोळीबाराची घटना त्यानंतर अनेक वर्षे राजकीय आणि न्यायालयीन चर्चेचा विषय राहिली. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीवरून प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंतही पोहोचले. राज्य सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार कर्णिक यांना इशारा देण्यात आला होता, तर अन्य तीन पोलिस अधिकाऱ्यांविरोधात विभागीय कारवाईची प्रक्रिया करण्यात आली होती.
या रक्तरंजित आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृती जपण्यासाठी मावळ तालुक्यात दरवर्षी आदरांजली वाहण्यात येते. त्याच परंपरेनुसार यंदाही शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुऱ्हे, विभागप्रमुख सदानंद भोसले, माजी विभागप्रमुख सुनील इंगुळकर, वाहतूक सेनेचे पुणे तालुकाध्यक्ष अवधूत चव्हाण, सतीश गरुड, वाहतूक सेनेचे तालुका संघटक दिनेश वीर, माजी उपतालुकाप्रमुख कैलास सगळे, माजी सरपंच अनिल भालेराव, पवन मावळ विभागप्रमुख सुरेश गुप्ता, कार्यालयप्रमुख सनी मोहिते, शाखाप्रमुख उमेश ठाकर, दत्ताभाऊ दाभाडे, विभाग संघटक अंकुश वाघमारे, लहू जाधव, सदानंद पिल्लाने, युवा सेनेचे सतीश गोनते आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न हा केवळ पाणीपुरवठ्याच्या एका प्रकल्पापुरता मर्यादित राहिला नाही. 9 ऑगस्ट 2011 च्या गोळीबारानंतर तो मावळातील शेतकऱ्यांचा हक्क, शेतीसाठीचे पाणी, विकास प्रकल्पांमधील स्थानिकांचा सहभाग आणि आंदोलन हाताळताना प्रशासनाने पाळावयाच्या मर्यादा या व्यापक प्रश्नांचे प्रतीक बनला. पंधरा वर्षांनंतरही त्या आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मृती मावळच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात जिवंत आहेत.

