Twiter : @vivekbhavsar
मुंबई
‘सरकारी काम आणि सहा महीने थांब’ हे सर्रास म्हटले जाते , कारण सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. पण सर्वसामान्यांचे सरकार असा प्रत्येक भाषणात उल्लेख करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील आणि त्यांचे श्रद्धास्थान स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने असलेल्या संस्थेने नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी केलेल्या मागणीला वैद्यकीय शिक्षण विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवत मुख्यमंत्र्यानाही ‘सहा महीने थांब’ या म्हणीचा प्रत्यंत आणून दिला आहे. मुख्यमंत्र्यानाही न जुमानण्याचा मुजोरपणा एका कनिष्ठ अधिकाऱ्यात कुठून आला असावा? असा प्रश्न सहाव्या मजल्यावरून विचारला जात आहे.
ठाण्यात स्वर्गीय आनंद दिघे यांनी आनंद विश्व गुरुकुल ही संस्था स्थापन केलेली आहे. याच संस्थेच्या शारदा एजुकेशन सोसायटीने या वर्षी जुलै महिन्यात ठाण्यात नर्सिंग कॉलेज (ANP and DNP course) सुरू करण्यासाठी रीतसर मार्गाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मागणी अर्ज सादर केला. प्रत्यक्षात ही परवानगी महाराष्ट्र नर्सिंग बोर्ड देते, मात्र, त्याचा प्रस्ताव शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभाकडून पुढे पाठवावा लागतो. सव्वा महिन्यात या मंत्रालयातील या विभागाने या फाइलवर केवळ योग्य तो शेरा मारून, प्रस्ताव पुढे पाठवावा की नाही, काही त्रुटि आहेत का हे कळवायचे होते.
सहाव्या मजल्यावरून मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदर्भ देणेही अनुचित समजले नाही आणि म्हणून तशी ओळखही दिली नाही. मात्र, प्रस्तावावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱ्याला जाणीव करून देण्यात आली की हा प्रस्ताव स्वर्गीय आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा आहे आणि स्वर्गीय दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे प्रस्तावावर योग्य टी टिपणी लिहून तो पुढे पाठवण्यात यावा.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने वैद्यकीय शिक्षण विभागातील त्या अधिकाऱ्याकडे किमान सहा वेळा प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा केला, मात्र, तो अधिकारी दाद द्यायला तयार नाही. मुख्यमंत्री यांच्याशी संबंधित आणि त्यांच्या शहरातील कामे अधिकारी करत नसतील तर सामान्य जनतेचे कुठले काम होत असेल असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जात आहे.