X: @milindmane70
महाड: रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा, सरकारी कामे यामुळे तालुक्यातील अनेक एक शिक्षकी शाळा कायम बंद राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेला आणखी एक शिक्षक जर दिला गेला नाही, तर टाळे ठोकू, असा इशारा कांबळे तर्फे महाड येथील शाळेतील पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिला आहे.
जिल्हा परिषद शाळांची सध्या अत्यंत बिकट अवस्था आहे. एकीकडे तालुक्याला पूर्णवेळ गट शिक्षण अधिकारी नसल्याने कुठेच ताळतंत्र नसल्याचे दिसून येत आहे. महाड पंचायत समितीकडे गटशिक्षणाधिकारीच नसल्याने शैक्षणिक धोरणाचा लाभ होत नसल्याने विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे. तालुक्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या अनेक शाळा यापूर्वीच पटसंख्या अभावी बंद पडल्या आहेत. शाळा बंद पडत असल्याने गोरगरीब मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी अशा जवळपास ३७३ शाळा आहेत, यापैकी 30 शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. शिक्षकांची कमतरता, कमी पटसंख्या यामुळे महाड तालुक्यातील आतापर्यंत जवळपास 30 हून अधिक शाळा बंद पडल्या आहेत.
तालुक्यातील कांबळे तर्फे महाड येथील जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे. ही केंद्र शाळा असून या ठिकाणी फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे. जवळपास 30 मुलांचा पट असताना देखील एकच शिक्षक असल्याने सातत्याने होणाऱ्या कार्यशाळा, शैक्षणिक कामासाठी शाळेवर कार्यरत असलेला शिक्षक गेल्यानंतर मुलांना घरी सोडले जाते. जून महिन्यापासून या ठिकाणी एकच शिक्षक असल्याने सातत्याने शाळा बंद ठेवली जात आहे. शाळा बंद राहत असल्याने गावातील गरीब मुलांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक पातळीवर पालक कमिटीने वारंवार तक्रार करून देखील कोणतीच कार्यवाही होत नाही असे सांगितले. शिक्षकाची मागणी सातत्याने होत असली तरी शिक्षक दिला जात नसल्याने कार्यशाळा आणि बैठकांच्या दिवशी शाळा बंद राहत असल्याने आणखी एक शिक्षक द्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र या मागणीचा विचार होत नसल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. शाळेला शिक्षक दिला नाही तर येत्या काही दिवसात टाळे ठोकले जाईल, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.
“मागील अनेक महिने आम्ही शिक्षकाची मागणी करत आहोत. मात्र शिक्षक दिला जात नसल्याने सध्या अस्तित्वात असलेले शिक्षक शैक्षणिक कामासाठी शाळा बंद ठेवत आहे. यामुळे मुलांची नुकसान होत आहे.” – अमजद परबनकर, अध्यक्ष शाळा पालक कमिटी.
Also Read: शरद पवार यांनी घेतला ईशान्य मुंबईसह १० लोकसभा मतदारसंघाचा आढावा
 
								 
                                 
                         
                            
