X: @therajkaran
पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुकीसाठी (General elections in Pakistan) मतदान होणार आहे. पाकिस्तानची दशा आणि दिशा निश्चित करणारी ही निवडणूक असेल. मात्र, या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागून आहे ते पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League – Nawaj) या पक्षाचे अध्यक्ष नवाज शरीफ आणि त्यांचे लहान बंधू शहाबाज शरीफ यांच्याकडे.
नवाज यांनी यापूर्वी तीनदा, तर शहाबाज यांनी एकदा पंतप्रधानपद भूषविले आहे. सर्वाधिक वेळा पंतप्रधानपद भूषवणारे नवाज शरीफ (former PM Nawaj Shariff) हे सर्वाधिक दुर्दैवी पंतप्रधानदेखील आहेत. ते आतापर्यंत एकदाही आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. दरवेळी वेगवेगळ्या संस्थेकडून त्यांचे सरकार बरखास्त झाले. हा तर एक जागतिक विक्रम ठरला आहे. नवाज शरीफ पहिल्यांदा 1990 मध्ये पंतप्रधान झाले. त्यानंतर तीनच वर्षात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गुलाम इसाक खान (President Gulam Ishaq Khan) यांनी संसदच बरखास्त करून टाकली.
सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court of Pakistan) दरवाजा ठोठावल्यानंतर नवाज शरीफ यांनी सरकार परत मिळवले. मात्र, 1995 मध्ये झालेल्या निवडणुकीत बेनझिर भुट्टो (Benazir Bhutto) यांनी त्यांचा पराभव केला. नवाज शरीफ १९९७ मध्ये पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ झाले. मात्र, यावेळी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (Parwez Musharraf) यांच्याशी त्यांचे तीव्र मतभेद झाले आणि त्याचे पर्यावसन मुशर्रफ यांच्या लष्करी उठावात झाले. सुमारे दहा वर्षे परदेशात राजकीय विजनवासात काढल्यानंतर 2013 मध्ये निवडणूक जिंकून नवाज शरीफ पुन्हा पंतप्रधान झाले. यावेळी त्यांच्या मार्गात पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय आले.
पनामा पेपर केस (Panama paper case) घोटाळ्यानंतर नवाज शरीफ यांचे नाव भ्रष्टाचाराच्या प्रकरणात समोर आले. सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवले आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घातली. सुमारे चार वर्ष लंडनमध्ये (London) काढल्यानंतर नवाज शरीफ पाकिस्तानात परत आले आहेत. आपला पक्ष सत्तेत आला तर विजेचे दर 20 ते 30 टक्क्यांनी कमी करू असे आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यात (election manifesto) दिले आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणू आणि त्याचबरोबर विजेचे उत्पादन किमान 15000 मेगावाटने वाढवू, ही त्यांची अन्य प्रमुख आश्वासने आहेत.
भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) 370 कलम पुन्हा बहाल केले तर भारताशी शांततेच्या मार्गाने मैत्रीपूर्ण संबंध ठेवू, असेदेखील नवाज शरीफ यांनी जाहीर केले आहे. येत्या निवडणुकीत नवाज शरीफ यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. चौथ्या वेळी तरी ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील का आणि दिलेली आश्वासने पाळतील का, याबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.