पुणे :पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत आहेत. या पार्श्वभूमीवर आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर एकत्रित टीका केली आहे.
“प्रथम गिरीश चौधरी यांचा जमीन घोटाळा – तेव्हा भाजप गप्प; आता खेवलकर प्रकरण – राष्ट्रवादी गप्प. सत्ता आणि सोयीसाठी पक्ष, भूमिका आणि टीका बदलणं हेच आजचं वास्तव,” असा आरोप त्यांनी केला.
त्याचबरोबर, पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, फर्ग्युसन रोड बार, कल्याणी नगर पार्टीज आणि विमानतळावर पकडल्या जाणाऱ्या ड्रग्ज प्रकरणांकडे लक्ष वेधून, “पुणे ड्रग्जचे केंद्र बनतेय का?” असा सवाल उपस्थित केला.
“पंजाबमध्ये आम आदमी पार्टी ड्रग्सविरोधात मोहीम राबवत आहे, पण महाराष्ट्रात सरकार फक्त गप्प आहे. रेव्ह पार्टी संस्कृतीमुळे तरुणांचे आयुष्य बर्बाद होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.