मुंबई : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत तातडीने कारवाई केली.
“लातूरमध्ये काल घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर उभी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या घटनेनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले.
“पक्षाच्या मूल्यांविरुद्ध जाणाऱ्या कोणत्याही वर्तनाला माफ केले जाणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
मात्र या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी आणखी मोठा सवाल उपस्थित केला आहे.
“सूरज चव्हाणचा राजीनामा घेतल्याबद्दल दादांचे आभार. पण खरे कारण वेगळे आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळल्यामुळे हा वाद निर्माण झाला. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेणे आवश्यक आहे,” असा थेट आरोप माने यांनी केला.
या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विसंवाद उफाळून आला असून लातूरची घटना सत्ताधारी पक्षातील वादळाचे केंद्रबिंदू ठरत आहे.