पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाने चर्चेत असलेल्या भूमी व्यवहार प्रकरणावर गंभीर आरोप करत शासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.
सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (माजी ट्विटर) वरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपल्याच्या प्रकरणात नव्हे, तर पुण्यातील बोपोडी येथील सर्वे क्रमांक ६२ मधील अॅग्रीकल्चर डेअरीच्या शासकीय मालकीच्या जमिनीचे खाजगी व्यक्तीस हस्तांतर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने सरकारची ४० एकर जमीन हडपल्याच्या प्रकरणात तहसीलदाराला अटक झाल्याच्या बातम्या पसरवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
सपकाळ यांनी याप्रकरणात शीतल तेजवानी यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. “शीतल तेजवानी यांनी शासनाच्या मालकीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून ती जमीन विकली. त्यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे. त्यामुळे विक्रेता आणि खरेदीदार — दोघांविरोधातही खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “फक्त दुय्यम निबंधकाला निलंबित करून चालणार नाही; जमिनीची विक्री करणारे आणि खरेदी करणारे दोघांवरही कारवाई झाली पाहिजे.”
सपकाळ यांच्या या ट्विटनंतर पार्थ पवार आणि त्यांच्या Amadea Holdings LLP या कंपनीविरोधातील विवाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

