मुंबई : शालेय शिक्षणात पहिलीपासून लहान मुलांना हिंदी ही तिसरी भाषा शिकवण्याच्या व त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यावर हट्टी भूमिका घेण्यावर ठाम असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे शुक्रवारी येथे त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व कामगार नेते किरण पावसकर यांनी संतप्तपणे खडे बोल सुनावत चांगलेच कान उपटले.
आज त्यांनी त्यांच्या एक्स माध्यमावर आपले म्हणणे मांडतांना शिक्षणमंत्री भुसे यांना काही बोचरे प्रश्नही विचारले. त्यात त्यांनी अगदी थेट मुद्द्याला हात घालत भुसे यांना सुनावले की, “आधी मला सरकारने सांगावे की केंद्र सरकारने हिंदी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे का,”….? आणि नसेल तर मग माझी प्राचीन मराठी भाषा जिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे ती भाषा इतर राज्यांमध्ये शिकवण्यासाठी एवढा अट्टाहास का करत नाही……? फक्तं आपल्याच राज्यात हिंदीचा अट्टाहास का…? अशा परखड शब्दांत पावसकर यांनी भुसे यांना खडे बोलही सुनावले.
पुढे पावसकर यांनी भुसे यांना आणखी कठोर भाषेत विचारणा केली की, आधी सरकारने आम्हाला एक सांगावं, कोणत्याही भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देताना केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत ना….? त्यात……१) भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे, २) भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे, ३) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत आणि ४) प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा । हे सर्व खरे आहे ना…बरं या सर्व निकषामध्ये मराठी भाषा बसत असल्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे ना….?
माझ्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे रोवले आहेत, अटकेपार समजलं असेल ना, म्हणजे अटक किल्ला जो आज पाकिस्तानमध्ये आहे तिथं पर्यंत…. असं काहीसे बोचरे व मार्मिक शब्दांची पेरणी करीत पावसकर यांनी मंत्री भुसे यांना एक अनाहुत सल्ला देताना बजावले की, इतके सगळे सुप्त अलंकार मराठी भाषेत असताना व आता तर तिला अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा मिळालेला असताना उलट तुम्ही या राज्याचे मंत्री व सरकार म्हणून केंद्र सरकारकडे मागणी करायला हवी की आता आमची मराठी भाषा संपूर्ण देशाला शिकवा म्हणून……! मगं हे नेमकं हिंदी भाषेसाठी इतके हट्टाला पेटण्यातून आपण काय साध्य करतोय….? अशी काहीशी तीव्र विचारणा पावसकर यांनी मंत्री भुसे यांच्यावर अगदी नेमक्या व मुद्देसूद प्रश्नांची सरबत्ती करत केली.
या महाराष्ट्राने चित्रपट सृष्टीचा जनक म्हणजे दादासाहेब फाळके दिले जे मराठी होते. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर जी मराठी, भारतरत्न सचिन तेंडुलकर जो मराठी, इतर अनेक दिग्गज जे जुन्या शिक्षण पद्धतीने शिकूणच मोठे झाले व अतिशय चांगले हिंदी बोलायचे व बोलतात. त्यामुळे आपले विचार चांगले ठेवा व मराठी भाषा वाढवा, हिंदी पेक्षा त्याला जास्त महत्व दिलं तर तुम्ही काही तरी वेगळं केलं असं दिसेल, असा उपदेशाचा कडक डोसही पावसकर यांनी मंत्री भुसे यांना दिला.
त्याचवेळी आता गलिच्छ राजकारण करून हिंदी नका शिकवायला जाऊ. त्यापेक्षा आपली मराठी भाषा देशात शिकवण्यात यावी असा आग्रह पंतप्रधान मोदी यांच्याकडे धरा, कारण ते हे करू शकतात”….. कारण “मोदी है तो मुमकिन है ” असे सुचवत पावसकर यांनी हिंदीत म्हण बोलल्याबद्दल क्षमाही मागितली.