मुंबई: कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून बदलापुरातील एका चिमुरडीवर अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी “पॉक्सो” कायद्यांतर्गत अटक केलेला सहआरोपी तुषार आपटे याची नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेला अवघे २४ तास उलटत नाहीत तोच विरोधकांच्या आरोपांचा कहर बरसताच भाजपने शनिवारी आपटेच्या स्वीकृत सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा घेतला.
आपटे हा ज्या संस्थेच्या शाळेत ही घटना घडली त्या संस्थेचा तो “आरएसएस” या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा संचालक सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेवर तुषार आपटे याची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत झळकताच सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे “फायरब्रँड” नेते, मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत आक्रमकपणे भाजपवर “विखारी” शब्दांत टीका केली. त्यापाठोपाठ शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्याच आक्रमक शैलीत घणाघाती हल्लाबोल केला.
आपटेच्या नियुक्तीवरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून हे प्रकरण आणखी चिघळणार, हे लक्षात येताच भाजपच्या प्रदेशस्तरीय शीर्षस्थ नेत्यांनी अवघ्या २४ तासांत आपटेचा स्वीकृत सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा घेतला.
याच संदर्भात भाजपच्या एका जुन्या जाणत्या व तब्बल तीन टर्म आमदार राहिलेल्या निष्ठावंत नेत्याची मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी तर धमालच उडवून दिली. फक्त आपले नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना त्यांनी सांगितले,
“जोपर्यंत मंत्रालयाचा सहावा माळा अशांच्या पाठीशी आहे, तोपर्यंत सर्व काही शक्य आहे… आजच्या घडीला मला अधिक काही विचारू नका. पण एक सांगतो, आधीच विधिमंडळाच्या त्या पदाची घोर अवहेलना झाली आहे.
आता मी एवढेच सांगेन की किमान मुंबई मनपाचा हातातोंडाशी आलेला घास आमच्याच पक्षाकडून हिसकावून घेतला गेला आहे. कारण अवघ्या मुंबईत या वृत्ताचे गंभीर पडसाद उमटत आहेत. नाक्यानाक्यावर पक्षावर ‘थू-थू’ होत आहे.
मात्र एक नक्की सांगतो, आमच्या या बोलघेवड्या, अती उतावीळ नेत्यांनी उद्धव व राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या हाती एक भक्कम प्रचाराचा आयता मुद्दा सोपवला आहे…!”
बदलापूरच्या या नामांकित शाळेत ऑगस्ट २०२४ मध्ये ही घटना घडली होती. त्यावेळी केंद्रातील भाजप पुरस्कृत दोन अतिमहत्त्वाच्या नेत्यांचे लाडके मुख्यमंत्री म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे होते.
त्यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून स्थानिक पोलिसांनी अक्षय शिंदे नावाच्या कथित संशयिताचा खोटी चकमक दाखवत एका अज्ञात स्थळी एन्काऊंटर केला होता. हा शिंदे आजपर्यंत एक गूढच राहिला आहे, हे राज्यातील जनता अजूनही विसरलेली नाही.
त्यामुळेच की काय, यानिमित्ताने आता या प्रकरणाचे पडसाद मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमटतीलच, पण त्याचा फटका फक्त भाजपलाच नव्हे तर प्रसिद्धीची जास्त आवड असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही नक्कीच भोगावा लागेल, हे मात्र निश्चित…

