मुंबई: बदलापूर-मुंबई प्रवास आता झपाट्याने होणार असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ‘अॅक्सेस कंट्रोल रोड’ प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे बदलापूर ते मुंबई प्रवास अवघ्या ६० मिनिटांत तर बदलापूर-नवी मुंबई प्रवास फक्त ३० मिनिटांत शक्य होणार आहे.
२०.६ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी १०,८३३ कोटींचा खर्च
बदलापूर ते हेदुटणे आणि विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका असा हा अॅक्सेस कंट्रोल रोड असेल. यासाठी २०.६ किमी लांब, आठ पदरी मार्ग तयार केला जाणार असून त्यामध्ये –
• ४ प्रमुख अंतरबदल मार्ग (Interchange)
• ५ वाहन भुयारी मार्ग (Underpasses)
• ३ किमी लांबीचा बोगदा
यांचा समावेश असेल. या प्रकल्पासाठी १०,८३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एमएमआरडीए लवकरच आराखडा तयार करणार आहे.
या ठिकाणी असतील महत्त्वाचे बदल
• ३.९५ किमी लांब व्हायाडक्ट (Viaduct)
• ताहुली हिल्स-शिरगाव दरम्यान ३ किमी लांबीचा बोगदा
• चामटोली, बदलापूर, हेदुटणे, कल्याण रिंग रोड याठिकाणी ४ प्रमुख अंतरबदल मार्ग
• अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, काटई नाका येथे वाहन भुयारी मार्ग
२०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार
या प्रकल्पामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या शहरांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडले जाणार आहे. हा मार्ग मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गावरील चामटोली (बदलापूर) येथे सुरू होऊन विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील हेदुटणे येथे संपणार आहे.
या प्रकल्पासाठी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातील तब्बल २०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे, अशी माहिती बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी दिली.
आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची निवड
हा प्रकल्प जलदगतीने मार्गी लागावा यासाठी एमएमआरडीएने आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याबाबत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर बदलापूरसह ठाणे जिल्ह्यातील पर्यटन, व्यवसाय आणि वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.