महाड
राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी अजूनही सुरू असून राज्यातील विधान परिषदेच्या (MLC election) चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक (election commission) जाहीर केली आहे. यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रत्येकी दोन जागेचा समावेश आहे. निवडणूक झाल्यास १० जून रोजी प्रत्यक्ष मतदान होईल.
राज्यातील मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. या मतदारसंघातील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे.
मुदत संपत असलेल्या सदस्यांमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून (Mumbai Graduate Constituency) निवडून गेलेले विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले भाजप सदस्य निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदार संघातील किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून गेलेले कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा समावेश आहे.
यातील विलास पोतनीस हे शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. तर कपिल पाटील यांच्या जनता पार्टीचे प्रमुख नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा पाटील यांनी समाजवादी गणराज्य पार्टी स्वतंत्र पक्षाची स्थापना करून महाविकास आघाडीतच राहण्याचा निर्णय घेतला. तर किशोर दारडे हे देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १५ मे पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. इच्छुक उमेदवारांनी २२ मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करायचे आहेत. अर्जाची छाननी २४ मे रोजी होणार आहे तर २७ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. गरज भासल्यास १० जूनला मतदान होणार असून १३ जूनला मतमोजणी होईल.