आरोग्य, ऐक्य आणि स्थानिक सहभागाचा उत्सव
महाड: आदित्य बिर्ला समूहाच्या ग्रासिम इंडस्ट्रीज अंतर्गत कार्यरत असलेल्या बिर्ला ओपस पेंट्स कंपनीतर्फे महाडमध्ये १ मार्च २०२६ रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील या कंपनीचा वर्षभर चालणारा समुदाय विकास कार्यक्रम स्थानिक समाजाशी नाती अधिक दृढ करण्यावर केंद्रित असून, त्यातील महाड हाफ मॅरेथॉन हा उत्साह, आरोग्य, ऐक्य आणि स्थानिक सहभागाचा भव्य उत्सव ठरणार आहे.
कंपनीतर्फे सांगण्यात आले की हा उपक्रम केवळ धावण्याची शर्यत नसून महाडच्या सांस्कृतिक व नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देणारे व्यासपीठ आहे. या स्पर्धेत चार प्रमुख श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत—
- २१.१ किमी टायम्ड हाफ मॅरेथॉन
- १० किमी टायम्ड युथ रन
- ५ किमी नॉन-टायम्ड ड्रीम रन
- ३ किमी नॉन-टायम्ड फन रन
या सर्व श्रेणींमुळे प्रत्येक सहभागीला सर्वसमावेशक व संस्मरणीय अनुभव मिळेल. स्पर्धेत एकूण ₹५.१ लाखांपर्यंत पारितोषिके ठेवण्यात आली असून महाड परिसरातील धावपटू, कुटुंबे आणि फिटनेसप्रेमींचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.
या उपक्रमाबद्दल बिर्ला ओपस पेंट्सचे सीओओ अजित कुमार म्हणाले, “महाडच्या जनतेने आम्हाला मनापासून स्वीकारले आहे. केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता स्थानिक प्रगतीला चालना देणे ही आमची कटिबद्ध जबाबदारी आहे. महाड हाफ मॅरेथॉन हा आरोग्यपूर्ण जीवनशैली, सामाजिक ऐक्य आणि उत्साही ऊर्जेचा एकत्र जल्लोष आहे. या कार्यक्रमाला मिळालेल्या पाठिंब्यासाठी आम्ही सर्व भागीदार व स्थानिक प्रशासनाचे ऋणी आहोत.”
स्पर्धकांनी १ मार्च २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजता महाडमधील काकर तळे येथील भिलारे मैदान येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे.
या संदर्भातील पत्रकार परिषदेत ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड (बिर्ला पेंट्स डिव्हिजन, महाड) यांच्यावतीने जनसंपर्क अधिकारी अरुण शिर्के, उत्पादन विभाग व्यवस्थापक दीपक बुट्टे, मनुष्यबळ विभाग व्यवस्थापक अमीर चव्हाण, राहुल बारटक्के, परचेस विभागाचे आकाश वर्मा, उत्पादन व गुणवत्ता विभागाचे उमेश खोत व जयेश सवसानी आदी अधिकारी उपस्थित होते.

