X : @vivekbhavsar
मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) महाराष्ट्रात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागेलेले भाजप (BJP) नेते आता आक्रमक झाले आहेत. भाजपविरोधात तयार झालेले ‘घटना बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम विरोधक, या आणि तत्सम नरेटीव खोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यापुढे राज्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तो पक्षाचा प्रवक्ता असल्याच्या भूमिकेत शिरून आपापल्या शहरात आणि गावात पक्षविरोधात केल्या जाणाऱ्या आरोपांना खोडून काढायचे आहे. अशा प्रकारच्या सुचनाच आज भाजपच्या चिंतन बैठकीत देण्यात आल्या.
पक्षाच्या दादर येथील वसंत स्मृति कार्यालयात जिल्हाध्यक्ष, मराठा आमदार आणि निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समारोपाचे भाषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकसभा निवडणुकीतील परभवावर बोलून नकारात्मक वातावरण तयार करण्यापेक्षा सर्वच नेत्यांनी पक्षाला कशी पूर्वीपेक्षा जास्त मते मिळाली यासारखी उदाहरणे देऊन सकारात्मक चर्चा केली आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘जान’ फुंकण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीला (Assembly elections) सामोरे जातांना विरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना, दाव्यांना तत्काळ उत्तर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. भाजपकडे जवळपास 100 प्रवक्ते आहेत, परंतु, यापुढे प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:ला पक्ष प्रवक्ता समजून उत्तरे देण्याची सूचना करण्यात आली. फक्त असे करतांना पक्ष अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्या, असे सांगण्यात आले. स्थानिक ठिकाणी, मतदारसंघात काही प्रश्न असतील तर त्यालाही न्याय द्या, विरोधकांचे आरोप फेटाळून लावा, यू ट्यूब वर विडियो तयार करा, अशाही सूचना देण्यात आल्या.
वक्फ बोर्डला दिलेल्या निधीवरून विश्व हिंदू परिषदेने भाजपविरोधात टीका केली आहे. त्यावरही बैठकीत चर्चा झाली. सरकार आणि पक्ष या दोन वेगळ्या संस्था आहेत, पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, परंतु, सरकार म्हणून सर्वांना समान वागणूक द्यावी लागते, मुस्लिम समाजाला आर्थिक मदत करणे हा सरकार म्हणून योग्य निर्णय आहे आणि त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ नये, असे यावेळी सांगण्यात आले. भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे, हे नरेटीव खोडून काढायला हवे असेही यावेळी सांगण्यात आले.