मुंबई — “‘बॉम्बे’ किंवा ‘बम्बई’चे ‘मुंबई’ करण्यात आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी इतिहास घडवला आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा गैरफायदा घेऊन विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये,” अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यपाल राम नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला.
प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी ‘आयआयटी बॉम्बे’ संदर्भात केलेली टिप्पणी ही इतिहासाची पुरेशी माहिती नसल्याने झाली असावी. “प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजल्यावर ते नक्कीच आपले विधान मागे घेतील,” असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
राम नाईक म्हणाले, “संपूर्ण इतिहास माहीत असलेल्या विरोधकांनी यावरून राजकीय टीकेची झोड उठवू नये. ‘मुंबई’ या नावाचे श्रेय आता ३० वर्षांनी हिसकावण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही.”
यावेळी नाईक यांनी १५ डिसेंबर १९९५ रोजी केंद्राने जारी केलेल्या अध्यादेशाची आठवण करून दिली— ज्याद्वारे सर्व भाषांत ‘बॉम्बे/बम्बई’ऐवजी ‘मुंबई’ हेच नाव अधिकृतपणे स्वीकारले गेले.
नाईक यांनी सांगितले की गाव/शहराचे नाव बदलण्याचा प्राथमिक अधिकार महसूल नियमांनुसार राज्य सरकाराचा असतो. राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जातो.
महाराष्ट्रात शिवसेना–भाजप सरकार आल्यानंतर, मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांनी प्रस्तावाची माहिती दिली. मंत्रिमंडळाने तो एकमताने मंजूर करून केंद्राकडे पाठवला. मात्र केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला.
यानंतर सततच्या पाठपुराव्यानंतर १५ डिसेंबर १९९५ रोजी केंद्राने अध्यादेश जारी करून अधिकृतपणे ‘मुंबई’ हेच नाव वापरण्याचा निर्णय घेतला.
नाईक यांनी पुढे सांगितले, अध्यादेशात हिंदी भाषेत नाव चुकीचे ‘मुम्बई’ असे लिहिले गेले. १९९९ मध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री असताना, तसेच गृह खात्याची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्या जवळ असताना २८ मे १९९९ रोजी अंतिम सुधारित आदेश काढून सर्व भाषांत ‘मुंबई’ हेच नाव निश्चित केले.
“वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्राची अस्मिता जपणारा हा ऐतिहासिक निर्णय घेण्याचे भाग्य मला लाभले,” असेही ते म्हणाले.
‘मुंबई’ अधिकृत झाल्यानंतरच देशातील इतरही ऐतिहासिक नावबदलाची प्रक्रिया सुरू झाली.
नाईक म्हणाले, मद्रासचे चेन्नई, कलकत्ताचे कोलकाता, बंगलोरचे बंगलुरू आणि त्रिवेंद्रमचे तिरुअनंतपुरम् करण्यात आले.
ही अनेक मूळ नावे सरकारमान्य होऊन सर्वत्र वापरली जाऊ लागली, असेही ते म्हणाले.

